दोन वर्षांपासून प्रेमसंबंध; लग्नाला नकार, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईलाही संपवलं
विरार : विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीत लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या (Virar Crime News) करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नॅन्सी मिश्रा (वय २४) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय ४५) यांचा जागीच मृत्यू (Virar Crime News) झाला. तर शिवम उपाध्याय असे आरोपीचे नाव असून, हल्ल्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.(Virar Crime News)
Virar Crime News: आईने अन् मुलीने लग्नाला विरोध केला अन्….
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी मंगळवारी रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शविला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला. याचाच राग मनात धरून संतप्त झालेल्या शिवमने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने नॅन्सी आणि तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली. हल्ल्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.(Virar Crime News)
Virar Crime News: आरोपीची मानसिक अवस्था आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू
घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी शिवम उपाध्याय विरोधात दुहेरी हत्येचा गुन्हा नोंदवला असून घटनेमागील नेमके कारण, आरोपीची मानसिक अवस्था आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीवर रुग्णालयात कडक पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.
Virar Crime News: पोलिसांनी सांगितली माहिती
बोळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावले यांनी माहिती देताना सांगितलं की, बोळींज येथे हद्दीत खूनाची घटना घडली होती. या घटनेबाबत समोर आलेली प्रथमिक माहिती अशी आहे की, आरोपी आणि मृत तरूणीचे दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते, आणि तो तिला लग्नासाठी बोलत होता, त्याची तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती, पण मुलीने आणि तिच्या आईने लग्नासाठी नकार दिला, या रागातून आरोपीने तरूणीची आणि तिच्या आईची सपासप वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने आपलाच गळा कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याबातत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जखमी आहे, त्याच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीचे शिक्षण दहावी झालेले असून तो एका दुकानात काम करतो. आरोपीची प्रकृती स्थिर आहे. पोटावर, पाठीवर, मानेवर वार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.