Mumbai News – स्पाईसजेटची काही उड्डाणे विलंबाने तर काही थेट रद्दच, संतप्त प्रवाशांकडून मुंबई विमानतळावर घोषणाबाजी
मुंबई विमानतळावर गुरुवारी स्पाईसजेटच्या विमानसेवेचा मोठा गोंधळ पहायला मिळाला. स्पाईसजेटची उड्डाणे विलंबाने करण्यात आली, तर काही अचानक रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 वर गुरुवारी गोंधळ पहायला मिळाला.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईहून दिल्लीला जाणारे स्पाइसजेटचे SG631 हे विमान जवळपास चार तास उशिराने आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रवाशांना विमानात चढवण्यात आले; मात्र त्यानंतर काही वेळाने ते विमान रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. प्रवाशांनी ‘स्पाईसजेट हाय हाय’च्या घोषणा देत विमानतळ परिसर दणाणून सोडला.
मुंबई-दिल्ली (SG 631), मुंबई-गोरखपूर (SG 553), मुंबई-बेंगळुरू (SG 669) ही उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच अहमदाबादला जाणारी उड्डाणेही तासनतास रखडली होती. याबाबत स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
तांत्रिक बिघाड आणि बागडोगरा येथील खराब हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. यामुळे क्रू मेंबर्सच्या ड्युटीच्या वेळेची मर्यादा संपल्याने उड्डाणे रद्द करावी लागली, असे एअरलाईन्सने निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करत प्रवाशांच्या समजूतदारपणाचे कौतुक करतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.