महाराष्ट्रासारखं वातावरण कुठेही नाही, म्हणून परप्रांतीय इथे येतात – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान दिले आणि त्यांचे विचार मांडले. भाषणात त्यांनी हिंदी सक्तीबाबत परखड मत व्यक्त केले. तसेच त्यांनी इतिहासाचे महत्त्व अधोरेखीत करत बोध घेण्यासाठी इतिहास वाचला जातो, असे सांगितले. महाराष्ट्राला शिवराय कळलेच नाहीत, याबाबतही राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्ती झाल्या आहेत. महाराष्ट्रासारखी संतपरंपरा इतर कोणत्याही राज्यात नाही. अशा अनेक गोष्टींचा बोध होण्यासाठी इतिहास महत्त्वाचा असतो. सगळ्यांना शिवछत्रपती कळले होते. मात्र, महाराष्ट्राला कळले नाहीत. महाराष्ट्राला शिवराय कळलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा अर्थ समजून घेण्यात समाज कमी पडत असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रासारखं वातावरण कुठेही नाही, म्हणून परप्रांतीय इथे येतात. महाराष्ट्रातील संधी, सहिष्णुता आणि प्रगत वातावरणामुळे देशभरातून लोक येथे येतात. मात्र, स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण झाले पाहिजे, यावर राज ठाकरे यांनी भर दिला. राज्यात कोणतीही भाषा सक्तीने लादता येणार नाही. हिंदी सक्ती करण्यासाठी आणखी हजार वर्षे जातील, असेही त्यांनी ठणकावले. राज ठाकरे यांनी भाषणात राजकारण्यांचाही खरपूस समाचार घेतला. राज्यातील राजकारण्यांनी राज्याचे वाट्टोळे केले, असे ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंशी बोलत होतो. शिवछत्रपतींच्या इतिहासातून बाबासाहेबांनी काय सांगितलं? तर त्यातून आपण बोध काय घेतो हे महत्त्वाचं आहे. त्यावर मला त्यांनी अप्रतिम गोष्ट सांगितली, ते म्हणाले होते शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळात कसं जगलं पाहिजे ते शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर कळतं. ५० वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्याला काय शिकवलं? महाराष्ट्राने कसं राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. अशाच अनेक गोष्टींची परंपरा ही फक्त महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्या प्रदेशांची राज्ये झाली. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्यात तुम्हाला अद्भूत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. देशाच्या इतर राज्यांमध्ये अशी माणसं सापडणार नाहीत.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना फटकारले. आम्ही मराठी बोलणार नाही, असे म्हणण्याची यांची हिंमतच कशी होते? आपले मंत्री त्यांना मराठी शिकायला वेळ देतात. बाकीच्या राज्यात असे होत नाही, तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा, तामिळनाडूमध्ये जाऊन बघा असे होत नाही. यांची लायन्स रद्द करा, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे.
सध्या आम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये सापडलो आहोत. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागले आहे. लेखक कोण आणि कवी कोण त्यांची देखील जात पाहिले जाते. जात पाहून पुस्तक विकत घेतले जाते. त्यांना फक्त वाद पेटवायचा आहे, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, असे आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.
Comments are closed.