हेलिकॉप्टरमधून एकाच वेळी दोन क्षेपणास्त्रे डागली.
नौदलाकडून यशस्वी चाचणी : गरज पडल्यास हवेतच लक्ष्य बदलण्यासही सक्षम
वृत्तसंस्था/ चांदीपूर
डीआरडीओ आणि नौदलाने नुकतीच ओडिशानजिक बंगालच्या उपसागरात हेलिकॉप्टरमधून कमी पल्ल्याचे नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्र यशस्वीरित्या डागले. हेलिकॉप्टरमधून अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने दोन क्षेपणास्त्रs डागण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी जहाजाच्या खालच्या भागावर अचूक निशाणा साधला. याद्वारे भारताने आपल्या ‘साल्वो लाँच’ क्षमतेची चाचणी घेतली. म्हणजेच, कमी कालावधीत एकाच लाँचरमधून अनेक क्षेपणास्त्रs डागण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. सदर क्षेपणास्त्र विविध डीआरडीओ प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. आता त्याचे उत्पादन देशांतर्गत केले जात आहे.
‘साल्वो लाँच’ हे तंत्रज्ञान शत्रूच्या रडार यंत्रणांना चकमा देऊ शकते. ओडिशाच्या चांदीपूर येथील चाचणी केंद्रावर स्थापित रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली आणि टेलिमेट्रीचा वापर करून क्षेपणास्त्राच्या संपूर्ण उ•ाणाचा आणि लक्ष्याचा मागोवा घेण्यात आला. या क्षेपणास्त्राच्या विकासामुळे लष्कराच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिमानाने सांगितले आहे.
जहाजांवर उच्च-नुकसानकारक हल्ला
यशस्वी चाचणी करण्यात आलेले क्षेपणास्त्र जहाजाच्या त्या भागाला लक्ष्य करते, जो हल्ल्यादरम्यान नुकसानीसाठी सर्वात असुरक्षित असतो. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपणासाठी बूस्टर आणि उ•ाण टिकवून ठेवण्यासाठी एका स्वतंत्र प्रणालीने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त लक्ष्य ओळखणे, मार्ग निश्चित करणे आणि उंची कायम राखण्यासाठी अनेक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एक विशेष प्रणाली असून त्याला उ•ाणादरम्यान नवीन माहिती प्राप्त करण्यास अनुमती देते. त्यामुळे आवश्यक असल्यास ते दिशा देखील बदलू शकते.
युद्धनौका प्रकल्पाच्या चाचण्याही पूर्ण
डीआरडीओ आणि नौदलाने एका नवीन युद्धनौका प्रकल्पासाठी हायड्रोडायनामिक कामगिरी आणि मॉडेल चाचणी पूर्ण केली. हे काम नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने संयुक्तपणे केले. या चाचण्यांमध्ये जहाजाचा वेग, पाण्यातील वर्तन, इंजिनची शक्ती आणि वळण्याची क्षमता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. याचे निकाल आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असल्याचे आढळले. डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी यासंबंधीची माहिती नौदल अधिकारी संजय साधू यांच्यासोबत शेअर केली आहे. यावेळी डीआरडीओ आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.