कोहली आला अन् इतिहास घडला! नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विक्रमी गर्दी, आयपीएल 2026मध्ये नवा रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही विराट कोहलीची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही, हे पुन्हा एकदा आयपीएल 2026 मध्ये पाहायला मिळाले. सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय असलेल्या कोहलीसाठी चाहत्यांची क्रेझ अजूनही शिगेला आहे.
गुरुवारी 30 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. गुजरातच्या घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात स्थानिक संघापेक्षा कोहलीच्या चाहत्यांचीच संख्या जास्त असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
एक लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये यापूर्वीच्या सामन्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. काही सामन्यांना 40-45 हजार प्रेक्षकही पोहोचले नव्हते. मात्र कोहली मैदानात उतरताच चित्र पूर्णपणे बदललं. या सामन्यासाठी तब्बल 90,865 अधिकृत प्रेक्षक उपस्थित होते, जे या हंगामातील विक्रमी उपस्थिती ठरली.
याआधी याच मैदानावर गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यासाठी केवळ 40,625 प्रेक्षक आले होते, तर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ही संख्या 34,211 इतकीच होती. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 44,551 प्रेक्षक उपस्थित होते. पण आरसीबीच्या सामन्याने सर्व विक्रम मोडले. यावरून कोहलीची लोकप्रियता किती अफाट आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.
दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं होतं. स्टेडियम खचाखच भरलेलं होतं, तर बाहेर तिकीटांसाठी मोठी गर्दी आणि काळाबाजारही सुरू होता. अनेक चाहत्यांना तिकीट मिळालंच नाही, तरीही ते कोहलीची एक झलक पाहण्यासाठी तासन्तास रांगेत उभे होते.
मात्र, कोहलीच्या चाहत्यांच्या पदरात निराशा पडली. कारण या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबी चा एकतर्फी पराभव केला.
Comments are closed.