मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम करणाऱ्या कंपनीचे VSR कंपनीशी कनेक्शन? रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत
महाराष्ट्रातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कंत्राटे बाहेरील राज्यातील कंपन्यांना दिली जात असून, त्या बदल्यात सत्ताधारी नेत्यांना मोठी ‘किकबॅक’ मिळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विकासकामांना आपला विरोध नाही, मात्र प्रकल्पांची किंमत वाढवून हजारो कोटींची दलाली खाल्ली जात असल्याची चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका बाजूला बाहेरील बड्या कंत्राटदारांची बिले तातडीने काढली जातात आणि दुसरीकडे स्थानिक मराठी कंत्राटदारांना हक्काच्या पैशांसाठी वणवण फिरावे लागते, ही सरकारची कार्यपद्धती अत्यंत चुकीची असल्याची टीका पवारांनी ट्वीटरवर पोस्ट करत केली आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. या प्रकल्पाचे काम करणारी ‘नवयुग ग्रुप’ ही कंपनी हैदराबादची असून ती आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी टीडीपी (TDP) नेत्यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सातत्याने बाहेरील राज्यातील आणि विशिष्ट राजकीय संबंध असलेल्या कंपन्यांनाच कशी मिळतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून यातून स्थानिक उद्योजकांवर अन्याय होत असल्याची भावना, रोहित पवार त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात होणारी मोठ्या इंफ्राप्रोजेक्टची बहुतांश कामे गुजरात, आंध्रप्रदेश यांसारख्या बाहेरील राज्यातील कंपन्यांनाच दिली जात असल्याची तसेच या कंपन्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या KickBack देखील देत असल्याची चर्चा आहे. विकास प्रकल्पांना विरोध नाही…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 1 मे 2026
या प्रकरणालासंदर्भात पुढे बोलताना रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या ताफ्यातील ‘VT-CMR’ या विमानाचा उल्लेख केला आहे. हे विमान नवयुग ग्रुपशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. “हा केवळ योगायोग समजावा की यामागे काही वेगळे गणित आहे?” असा खोचक सवाल विचारत त्यांनी या व्यवहारांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्राचा पैसा बाहेरील कंत्राटदारांच्या घशात घालून स्थानिक मराठी माणसाला ‘उपाशी’ ठेवण्याचे पाप हे सरकार करत असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Comments are closed.