Ratnagiri News – महामार्गावरील संपूर्ण वृक्ष लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करण्याची हमी, लेखी आश्वासनानंतर स्थगित

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हायवे वृक्ष लागवड समितीच्या वतीने इंदापूर ते राजापूर या सुमारे २८८ कि.मी. लांबीच्या महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याच्या मागणीसाठी छेडलेल्या भूसमाधी आंदोलन आणि आमरण उपोषणाला पहिल्या टप्प्यात चांगलेच यश मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी हमी पत्र दिल्याने तीन तास चाललेले हे उपोषण अखेर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शाहनवाज शाह यांनी केले असून त्यांच्या सहकाऱ्यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी तसेच मध्यानांमध्ये नियोजनबद्ध वृक्षलागवड करावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चेला गती दिली.

यानंतर रत्नागिरी विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव या अधिकाऱ्यांसह दुपारी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. यापूर्वी २९ एप्रिल रोजी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाने त्या मान्य केल्या आणि लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. प्रशासनासोबत सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेनंतर संबंधित मागण्यांवर लेखी हमी देण्यात आली. त्यानुसार, ३१ मेपर्यंत खड्डे खणण्याची कामे पूर्ण करणे, ५ ते ७ फूट उंचीची रोपे लावणे, तसेच कोकणातील जैवविविधतेशी सुसंगत प्रजातींची लागवड करणे या बाबींवर सहमती झाली आहे. याशिवाय, १५ जुलैपर्यंत संपूर्ण लागवड पूर्ण करणे, रस्त्याच्या मधील भागात डांबर व सिमेंट काढून सुपीक माती टाकून लागवड करणे, तसेच ऑक्टोबरनंतर गवत काढून नियमित पाणी देत रोपांचे संगोपन करणे या मागण्यांचाही समावेश आहे. या सर्व बाबी १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची लेखी हमी प्रशासनाने दिली आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या आश्वासनाला प्रतिसाद देत, ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. तसेच कामाच्या प्रगतीवर दररोज (डे-टू-डे) लक्ष ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकारी अभियंता यांनी नियोजित वेळेत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.

या चर्चेत रामशेठ रेडीज, प्रकाश काणे, भरत लबद्धे भाऊ काटदरे, बाळा कदम, मुराद अडरेकर, पंकज दळवी, किशोर रेडीज, पराग वडके, अरुण भोजने, उदय ओतारी, मुबिन गोठे, पृथ्वीराज पवार, चिपळूणकर आदींनी सहभाग घेतला. तसेच आसिफ मुकादम, तानू आंबेकर, नगरसेवक अजय भालेकर, माजी नगरसेवक किशोर रेडीज, नैनेश दळी, सज्जाद काद्री, नगरसेविका सफा गोठे, स्वाती भोजने, रविना गुजर, निर्मला जाधव, आश्विनी भुस्कुटे, तृप्ती कदम, राधा लवेकर यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला

Comments are closed.