नवी मुंबईतील 1 हजार 745 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई; भाडे नाकारणे, जास्त प्रवासी बसवणे, सिग्नल तोडणे अंगलट आले
भाडे नाकारणे, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवणे, विरुद्ध दिशेने वाहन दामटणे, सिग्नल तोडणे नवी मुंबईतील रिक्षाचालकांच्या अंगलट आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसांत १ हजार ७४५ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे रिक्षाचालकांसह वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई शहरात अनधिकृत रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बेकायदा रिक्षा थांब्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अनेक रिक्षाचालक बिनधास्तपणे कुठेही आपले वाहन उभे करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांना सरळ करण्यासाठी तीन दिवस विशेष मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत शहरातील १ हजार ७४५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भाडे नाकारणाऱ्या ४०४, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या १५, वाहतूककोंडी करणाऱ्या १००, जास्त प्रवासी बसवणाऱ्या ८८५, सिग्नल तोडणाऱ्या ४४, गणवेश न घालणाऱ्या १४३ आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १५४ रिक्षाचालकांचा त्यात समावेश आहे.
दहा मद्यपींवर झडप
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईसाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अन्य वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याच मोहिमेंतर्गत पोलिसांनी दहा मद्यपी चालकांची धरपकडही केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिल्यामुळे वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Comments are closed.