पालघर जिल्ह्यातील बेकायदा शाळांचे पालकांना टेन्शन, वारंवार नोटिसा बजावूनही कारवाई नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा शाळा सुरू असून या शाळांचे पालकांना टेन्शन आले आहे. किमान चाळीसहून अधिक शाळा बेकायदा असल्याची शक्यता असून त्याचा अधिकृत अहवाल तयार करण्याचे काम शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. वारंवार नोटिसा बजावूनदेखील या बेकायदा शाळा राजरोसपणे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यच धोक्यात आले आहे. अशा शाळांचा व त्या चालवणाऱ्या संस्थाचालकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक शैक्षणिक संस्था नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे शाळांचा कारभार करत आहेत. परवानगी नसतानादेखील विविध प्रकारची आमिषे पालकांना दाखवून या शाळा चालवल्या जातात. 2024 मध्ये वसई तालुक्यात 55, पालघरमध्ये 6 बेकायदा शाळा होत्या. दिवसेंदिवस या शाळांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सध्या टेन्शन आले असल्याचे दिसून आले आहे.

“आम्हाला संबंधित शाळा अनधिकृत असल्याची कोणतीही माहिती नव्हती. मुलांच्या चांगल्या शिक्षणाच्या उद्देशाने आम्ही त्या शाळेत प्रवेश घेतला. शाळेची मान्यता किंवा कायदेशीर बाबी याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आता ही बाब समोर आल्यानंतर आम्हाला मोठी चिंता वाटत आहे.”
– वजीत अन्सारी, (पालक)

“पालघरातील ज्या शाळांना यू-डायस क्रमांक प्राप्त नाही अशा शाळांना शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा घोषित करून अशा शाळांची यादी तात्काळ प्रसिद्ध करून कारवाई करावी.” – गणेश प्रधान, (अध्यक्ष, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ)

“अनधिकृत शाळांसंदर्भात अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. अहवाल तयार झाल्यास वरिष्ठांकडे पाठवून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
– मनोज रानडे, (मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद)

Comments are closed.