सरमा यांच्या विधानावर बांगलादेशचा आक्षेप

राजदुतांना बोलवून केली नाराजी व्यक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, ढाका

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या कथित वक्तव्यावर बांगलादेशने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 26 एप्रिल रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी एका निवेदनात आसाममध्ये पकडलेल्या 20 परदेशी नागरिकांना बांगलादेशला माघारी पाठवण्यात आल्याचे नमूद केले होते. यासंबंधी बांगलादेशने भारतीय कार्यवाहक राजदूत पवन बाधे यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून औपचारिक निषेध नोंदवला. संवेदनशील विषयांवर संयम बाळगणे आवश्यक आहे आणि अशा सार्वजनिक वक्तव्यांचा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी राजदुतांना सांगितले. सरमा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. बांगलादेशने या टिप्पण्यांना ‘प्रतिकूल’ असे संबोधतानाच दोन्ही देशांमधील विश्वासावर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.

भारत आणि बांगलादेश यांचे ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या मजबूत संबंध असून ते 1971 च्या मुक्तिसंग्रामादरम्यान प्रस्थापित झाले. तथापि, काही विशिष्ट मुद्यांवर दोन्ही देशांमधील अलीकडील संवेदनशीलता कायम आहे. ढाक्यातील अलीकडील राजकीय बदलांनंतर, द्विपक्षीय संबंध एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असतानाच सहकार्य आणि आव्हाने समोर येत आहेत.

Comments are closed.