Raja Shivaji Review – शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची महागाथा!
>> गणेश पुराणिक
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत. महाराजांच्या आयुष्यावर आजवर अनेक चित्रपट आले, पण रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ इतिहास सांगत नाही, तर तो ‘स्वराज्य’ या संकल्पनेचा आत्मा पडद्यावर जिवंत करतो. हा चित्रपट म्हणजे शिवरायांच्या शौर्याचे, धैर्याचे आणि कार्याचे दिमाखदार सादरीकरण तेही तितक्याच भव्य शैलीत असेच म्हणावे लागेल.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे लेखन आणि संशोधन. हा चित्रपट केवळ युद्ध आणि रक्तपातावर लक्ष केंद्रित न करता महाराजांच्या विचारसरणीवर आणि रणनीतीवर भाष्य करतो. चित्रपटाची विभागणी वेगवेगळ्या भागांमध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे शिवरायांच्या बालपणातील संस्कारांपासून ते हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या धाडसी निर्णयांपर्यंतचा प्रवास उलगडत जातो. मुघल आणि मराठी सत्तेतील राजकारण आणि महाराजांची गनिमी कावा ही निती अत्यंत प्रभावीपणे चित्रपटात मांडण्यात आली आहे.
लेखक आणि दिग्दर्शक या भूमिकांसोबतच रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका अत्यंत तन्मयतेने साकारली आहे. त्याची शरीरयष्टी आणि संवादफेक या भूमिकेला पूर्ण न्याय देतात. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम अभिनय ठरला आहे. अफझलखानाच्या भूमिकेत संजय दत्तचा वावर अत्यंत रौद्र आणि क्रूर आहे. तो पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या मनात संताप निर्माण होतो, हेच त्याच्या अभिनयाचे यश आहे. थोरले बंधू संभाजी भोसले यांच्या भूमिकेत अभिषेकने प्राण फुंकले आहेत. त्याचा पडद्यावरील भारदस्त वावर आणि भावनिक संघर्ष प्रेक्षकांना भावतो. सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांचा अभिनय कथेला अधिक समृद्ध करतो. जेनेलिया देशमुख यांनी महाराणी सईबाईंची भूमिका लहान असली तरी प्रभावीपणे साकारली आहे. तसेच, सलमान खानचा जिवा महालाच्या भूमिकेतील कॅमिओ प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरतो.
अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाचा आत्मा आहे. पार्श्वसंगीत अंगावर शहारे आणणारे असून ते प्रेक्षकाला थेट ऐतिहासिक काळात घेऊन जाते. रितेश देशमुखने दिग्दर्शक म्हणून प्रत्येक फ्रेममध्ये मेहनत घेतली आहे. सेट डिझाइन आणि वेशभूषा वास्तववादी वाटते. जरी काही ठिकाणी व्हीएफएक्समध्ये सुधारणेला वाव वाटला. तरी कथेची आणि भावनांची ताकद इतकी मोठी आहे की त्याकडे दुर्लक्ष होते. संवाद साधे असूनही प्रभावी आहेत. अनावश्यक नाटकीपणा टाळून स्वराज्याचा विचार मांडण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, ज्यांना अॅक्शनपॅक्ड ऐतिहासिक चित्रपटांची सवय आहे त्यांना कदाचित या चित्रपटाची गती काही ठिकाणी संथ वाटू शकेल. मात्र, ही संथ गतीच प्रेक्षकांना महाराजांच्या विचारांची खोली समजून घेण्यास मदत करते. हा चित्रपट केवळ डोळ्यांसाठी भव्य नाही, तर मनाला समृद्ध करणारा अनुभव आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने आणि शिवप्रेमींनी आवर्जून पाहावा असा आहे. रितेश देशमुखने एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर आपली मोहोर उमटवली आहे. हा चित्रपट म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि स्वराज्याच्या संस्कारांची शिदोरी आहे.
दिग्दर्शन – रितेश देशमुख
कलाकार- संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनेलिया देशमुख
लेखन – अजित वाडेकर, संदीप पाटील, रितेश देशमुख
रेटिंग – ४/५
Comments are closed.