बाळांतपणानंतर वाढलेलं वजन अन् आक्षेपार्ह कमेंट्स… स्वरा भास्करनं ट्रोलर्सचा घेतला खरपूस समाचार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूडची परखड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. बाळांतपणानंतर वाढलेल्या वजनावरून सातत्याने ट्रोल करणाऱ्यांचा तिने खरपूस समाचार घेतला आहे. माझे शरीर हा तुमच्या चर्चेचा विषय नाही, अशा शब्दांमध्ये तिने ट्रोलर्सला सुनावले आहे. एवढेच नाही तर महिलांच्या शरीराकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनावरही तिने ताशेरे ओढले आहेत.

स्वरा भास्कर हिने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा 2018 मधील एक जुना फोटो आणि सध्याचा तिच्या मुलीसोबतचा फोटो कोलाज करून शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. एवढेच नाही तर घाणेरड्या शब्दांमध्ये आक्षेपार्ह कमेंट्सही करण्यात आल्या होत्या. यावर आता स्वराने परखड शब्दांमध्ये भाष्य केले असून ट्रोलर्सला फटकावून काढले. महिलांचे शरीर हे केवळ ग्लॅमर किंवा आकर्षणाचे साधन नसल्याचे स्वरा म्हणाली. तसेच एका अनोखळी व्यक्तीच्या इच्छेखातर मी वजन कमी करावे हे देखील अनाकलनीय असल्याचे ती म्हणाली.

चित्रपटसृष्टीत प्रसूतीनंतर अभिनेत्रींनी लगेच फिट होण्याचा एक पायंडा पडला आहे. मात्र स्वराने याला विरोध दर्शवला आहे. मी जाणीवपूर्वक पुन्हा पूर्वीसारखे शरीर मिळवण्याचा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा तुम्ही आई झालात की आयुष्य कायमचे बदलते. आपण आपल्या तरुणपणीच्या शरीराची आठवण काढू शकतो पण पुन्हा त्याच जुन्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करणे ही स्वतःवर केलेली क्रूरता आहे, असे ती म्हणाली.

शरीराने एका नवीन जीवाला जन्म दिला आहे. त्याचे संगोपन केले आहे. त्यामुळे शरीरात बदल होणे हा निसर्गाचा भाग आहे, असेही स्वरा म्हणाली. तसेच अभिनय कौशल्याचा संबंध वजनाशी नसून प्रतिभेशी असतो. माझे विचार म्हणजे फिटनेसला असलेला विरोध नाही तर स्त्रियांवर लादल्या जाणाऱ्या मानसिक दबावाविरुद्ध दिलेली प्रतिक्रिया आहे, असेही तिने स्पष्ट केले.

दरम्यान, स्वरा भास्करने 2023 मध्ये मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव राबिया असे ठेवले आहे. ती शेवटची 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जहाँ चार यार’ या चित्रपटात दिसली होती.

Comments are closed.