Ratnagiri News – पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाखांची फसवणूक करणाऱ्याला 5 वर्षे कारावास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या योगेश गणपत चव्हाण (रा. नवी मुंबई) याला रत्नागिरी सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा निकाल दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश चव्हाण याने २०१० मध्ये ‘ड्रीम नॅचरल लँड डेव्हलपर्स’ आणि ‘स्वरा इंटरप्रायझेस’ या नावांच्या कंपन्या स्थापन केल्या होत्या. रिझर्व्ह बँक किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता त्याने गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. गुंतवणूकदारांना ४ ते ६ महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मुदत संपल्यानंतर आरोपीने पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. तसेच त्याने परवाना नसताना बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसायही केला होता.

याप्रकरणी २०१० मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर जामिनावर सुटलेला आरोपी बराच काळ फरार होता. दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला या खटल्यासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले आणि एकूण ३० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. १५ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Comments are closed.