लेख – भारतीयत्व क्लिक करणारी आख्यायिका
>> प्रकाश बाळ जोशी
आपल्या लेन्समधून भारतीय जनजीवनाचे विलोभनीय दर्शन घडवणारे, जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ छायाचित्रकार, पद्मश्री रघु राय यांनी भारतीय जनजीवन, संस्कृती आणि सामाजिक संवेदना आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपल्या. राय यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेच्या विदारक छायाचित्रांद्वारे मानवी दुःखाची जागतिक जाणीव करून दिली. केवळ घटना कॅमेरात न पकडता भारतीय संस्कृती आणि सामाजिक संवेदनांचे हुबेहूब दर्शन घडवले. आधुनिक भारताचा प्रवास उलगडणारी त्यांची कला पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल. रघु राय अशी एक आख्यायिका होते ज्याने केवळ क्षण टिपले नाहीत तर त्यांना अर्थ दिला.
दीर्घकाळ प्रोटेस्ट कॅन्सरबरोबर लढा देत असलेल्या रघू राय यांचे निधन झाले. भारतीय फोटोग्राफीचे एक देदीप्यमान युग संपले. ज्या शांतपणे आणि सहजतेने ते आपल्या कॅमेऱ्याची क्लिक दाबत त्याच पद्धतीने ते फोटोग्राफीचा एक मोठा वारसा आपल्या मागे ठेऊन शांतपणे निघून गेले.
रघू राय यांची नजर गजब होती. वर्तमानपत्रातील धावपळीचे आणि नेमके क्षण टिपण्याची जबाबदारी असूनसुद्धा अतिशय शांतपणे वाट बघत त्यांना हवा तो क्षण ते टिपत गेले आणि बघता बघता आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी स्वतंत्र भारताच्या सहा दशकांहून अधिक काळातील घटना, व्यक्ती, संघर्ष, यश, अपयश यांचा दृश्य इतिहासच कायमस्वरूपी कैद केला.
उंचेपुरे सदा हसतमुख रघू राय यांची माझी पहिली भेट सत्तरच्या दशकात माझे मित्र `इंडियन एक्सप्रेस’चे फोटोग्राफर सॅबी फर्नांडीस यांच्या बरोबर झाली. त्या वेळी मला जाणवला तो त्यांचा अगदी साधेपणा आणि वागण्याबोलण्यातील सहजता. पुढच्या काळात त्यांची फोटोग्राफर म्हणून जगभर गाजलेली कारकीर्द डोळ्यांसमोरच घडली. त्यानंतर एक-दोन वेळा ते दिल्लीतील ललित कला अकादमीच्या गॅलरीतही भेटले होते, पण पहिल्या भेटीत जे रघू राय भेटले ते तसेच साधे सरळ सहज हसमुख राहिले. मला त्यांची छायाचित्रे पाहताना एक गोष्ट नेहमी वाटत आली ती म्हणजे त्यांचे फोटोग्राफ्ससुद्धा त्यांच्या सारखेच साधे सरळ सहज सुंदर असतात. त्यात त्यांना जे दाखवायाचे असते, सांगायचे असते ते एकदम मनाला भिडणारे असते. त्यात सुंदर दिसावे, विषय ठळकपणे मांडला जावा यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले अजिबात दिसत नाहीत. सहजपणे प्रभावी पद्धतीने क्षण टिपण्याचे त्यांचे कसब हे त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते.
सिव्हिल इंजिनीअरचे शिक्षण घेऊन भाऊ एस. पॉल यांच्या प्रभावामुळे रघू राय फोटोग्राफीकडे वळले, पण त्यात आपण काही तरी फार मोठे काम करतोय, कलात्मक फोटोग्राफी करतोय किंवा इतिहासाचं डॉक्युमेंटेशन करतोय वगैरे समजूत घेऊन ते कधीच वावरले नाहीत. अतिशय शांतपणे समोर घडणाऱ्या घटनेतील एक क्षण निवडून तो अतिशय तटस्थ निर्विकार मनाने टिपणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी अतिशय संवेदनाक्षम आणि स्थिर मन आवश्यक. भोवताली घडणाऱ्या घटनांची समज आणि त्यातील भाव टिपताना काय आणि कसे आणि केव्हा टिपायचे हे रघू राय यांचे तंत्र भारतातील फोटोजर्नलिझमचा पायाच ठरला.
इतकी वर्षे त्यांची छायाचित्रे पाहताना एक जाणवते ते म्हणजे मानवी मनाचे, समाजातील बदलाचे अतिशय संवेदनशीलतेने रघू राय यांनी केलेले चित्रण. त्या त्या काळातील महत्त्वाचे क्षण टिपण्याची त्यांची जादू आणि प्रत्येक फोटो या अतिशय विशिष्टपूर्ण आयकॉनिक बनवण्याचा त्यांचा हातखंडा. सत्ताधारी नेत्यांपासून श्रीमंत, गरीब कष्टकरी टिपलेले भावपूर्ण चेहरे म्हणजे शब्दांशिवाय केलेल्या कविता. काही गोड काही वेदनामयी, तर कधी कुठे काळाची अपरिहार्यता सहजपणे टिपलेली.
पॅरिसमध्ये त्यांच्या फोटोग्राफ्सचे प्रदर्शन भरवल्यानंतर त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना खूपच लवकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वलय लाभले. हेनरी कार्तिये ब्रेसो यांचा सुरुवातीच्या काळातील कामावर प्रभाव दिसतो. एखाद्या घडामोडीत नेमका महत्त्वाचा क्षण कोणता हे टिपण्याची दोघांची पद्धत एकच दिसते, परंतु नंतरच्या काळात त्यांच्या फोटोग्राफीत भारतीयत्व मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यात अवकाश व्यापून टाकणारे बोलके आकाश, स्थानीय रंग, दाटीवाटीत राहणारे मोठे समुदाय, स्वतशीच आत्ममग्न असणारे बोलके चेहरे प्रकर्षाने जाणवतात.
पॅरिस येथील प्रदर्शनानंतर रघू राय यांना मॅग्नम फोटोज या जगातील सर्वोच्च फोटोग्राफर्सच्या संघटनेत 1977 मध्ये प्रवेश मिळाला. ते पहिले भारतीय Magnum सदस्य होते.
ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रांवर त्यांचा फार मोठा भर होता. फोटोजर्नालिझममुळे त्यांचा प्रचंड प्रवास आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक टप्प्यावर उपस्थिती राहिली. ते नेहमी म्हणत, “भारत हा माझा कॅनव्हास आहे.” त्यामुळे भारतातील निसर्ग आणि समाजातील विविधता त्यांनी अतिशय समर्पकपणे आपल्या कॅमेऱ्याने टिपली.
आपल्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी इंदिरा गांधी, मदर टेरेसा, दलाई लामा, बिस्मिल्लाह खान यांचे पोर्ट्रेट्स जसे टिपले तसेच त्यांनी अनेक रस्त्यावरच्या कष्ट करणाऱ्या सामान्य माणसांचेही पोर्ट्रेट टिपले. ताजमहाल, खजुराहो, वाराणसीतील गंगाकिनारा किंवा कुंभ मेळा यांचे त्यांनी काढलेले फोटो त्यांचे वैशिट्य तर दाखवतातच, पण त्याचबरोबर रघू राय यांची सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचे मिश्रण करणारी अनोखी शैलीही दिसून येते. मुंबई शहरातील लोकलमधून प्रवास करताना वर्तमानपत्रे वाचणारे प्रवासी त्यांनी प्रथमच कॅमेऱ्यात बंद केले.
बांगलादेश आजही अशांतच आहे. तो ज्या वेळी स्वतंत्र झाला तेव्हा हजारो लोकांच्या वेदना आणि आशा रघू राय यांनी एकाच फ्रेममध्ये सादर केल्या. मुक्तिवाहिनी, हजारो निर्वासित आणि त्यांचे होणारे हाल लोकांपुढे मांडले. या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. फोटोजर्नालिस्टला मिळालेला पहिला उच्च नागरी सन्मान मानला जातो.
रघू राय यांना अनेक मानसन्मान मिळाले. नॅशनल जिओग्राफी या प्रसिद्ध मासिकाने त्यांना `Human Management of Wildlife in India` ही कव्हर स्टोरी 1992 मध्ये केल्याबद्दल `फोटोग्राफर ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर केला. अनेक विषयांवर त्यांनी काढलेल्या फोटोग्राफ्सची पुस्तके आज उपलब्ध आहेत. हे केवळ पुस्तके नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा आहे. रघू राय हे केवळ फोटोग्राफर होते का? मला असे वाटते की, ते केवळ फोटोग्राफर नव्हते तर स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या राजकीय उलथापालथी, सामाजिक बदल, सांस्कृतिक समृद्धी आणि मानवी संघर्षांना त्यांनी आपल्या फोटोग्राफीद्वारे कायमचे बंद करून ठेवले आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही त्यातून आपल्या संस्कृतीचा प्रवास सहजपणे बघता येईल .
भोपाळ शहरातील विषारी वायूची गळती ही आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्या वेळी रघू राय भोपाळला गेले आणि त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात त्या वायू गळतीमुळे झालेल्या प्रचंड वाताहतीचे चित्रण केले. त्या वेळी त्यांनी घेतलेला एक फोटो मात्र माझ्या मनातून आजही पुसला जात नाहीय. एका लहान मुलाला जमिनीत अर्धवट पुरले आहे, त्याचे बटबटीत डोळे उघडे आहेत त्याचा तो जवळून घेतलेला फोटो. फक्त एक हात त्या चेहऱ्यावर आहे आणि तो हात मृत मुलाच्या चेहऱ्यावरून फिरतोय. त्या स्तब्ध झालेल्या हाताला तीन बोटे सरळ आहेत, तर दोन दुमडलेली. भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक अपघाताचा तो एक फोटो म्हणजे एक काळवंडलेला चेहराच बनला आहे.
रघू राय आज नसले तरी त्यांनी क्लिक केलेले क्षण आपल्याबरोबर कायम राहतील.
(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आहेत.)



Comments are closed.