गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज IPL 2026 : आयपीएलच्या (IPL) 46 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) पंजाब किंग्जचा (PBKS) 4 गडी राखून पराभव केला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने पंजाबला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 163 धावा फलकावर लावल्या. 164 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात 4 गडी राखून विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात जेसन होल्डर आणि साई सुदर्शनने महत्त्वाची भूमिका बजावली.

पंजाबविरुद्ध अहमदाबादमधील पहिला विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज दोनदा समोरासमोर आले होते. या दोन्ही सामन्यांत पंजाबने गुजरातचा त्यांच्याच घरच्या मैदानात पराभव केला होता. मात्र, आजच्या विजयामुळे गुजरातने हा इतिहास बदलला असून घरच्या मैदानावर पंजाबविरुद्ध आपला पहिला विजय नोंदवला आहे.

जेसन होल्डरचा दणका!

गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्याच षटकात दोन धक्के देत पंजाबला अडचणीत टाकले. त्याने दुसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्य (2 धावा) याला बाद केले, तर तिसऱ्याच चेंडूवर कूपर कॉनलीला खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर कागिसो रबाडा याने प्रभसिमरन सिंगला बाद करत तिसरा धक्का दिला. जेसन होल्डरने निहाल वढेरा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना माघारी धाडले. अय्यरने 21 चेंडूत 19 धावा केल्या. परिणामी, पंजाब किंग्सचा अर्धा संघ अवघ्या 8.4 षटकांत 47 धावांवर बाद झाला.

यानंतर सूर्यांश शेडगे आणि मार्कस स्टॉइनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 79 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शेडगेने आक्रमक फलंदाजी करत 29 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 57 धावा केल्या, मात्र अर्धशतकानंतर तो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्टॉइनिसही 31 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले, पण तो होल्डरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मार्को जानसेनने 20 धावा करत थोडी भर घातली. गुजरात टायटन्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर रशीद खान याने 1 विकेट घेतली.

शुभमन स्वस्त्यात बाद, पण सुदर्शनची झुंज

164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात पंजाबच्या अर्शदीप सिंगने कर्णधार शुभमन गिलला अवघ्या 5 धावांवर बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. सुरुवातीचा धक्का बसल्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी डाव सावरला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, ही जोडी धोकादायक ठरत असतानाच विजयकुमार विशाकने बटलरला (26 धावा) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात आलेल्या निशांत संधूकडून अपेक्षा होत्या, पण मार्कस स्टोइनिसने त्याला 15 धावांवर बाद करत गुजरातच्या अडचणी वाढवल्या. एका बाजूने खिंड लढवणाऱ्या साई सुदर्शनने 23 चेंडूंमध्ये 40 धावांची केल्या आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

आणखी वाचा

Comments are closed.