जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यापासून पगार थकले, राज्यभरात आंदोलन
जल जीवन मिशन (JJM) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBMG) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकले आहे. म्हणू या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात असहकार आंदोलन उभे केले आहे. 20 एप्रिलपासून सुरू झालेले हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याच्या मार्गावर असून मे महिन्यापासून आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास 5 महिन्यांपासून मानधन थकले आहे, तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुमारे 3 महिन्यांपासून देयके मिळालेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून मानधन वितरण अनियमित झाल्याने कर्मचाऱ्यांना भाडे, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत खर्च भागवणे कठीण झाले आहे. यासंदर्भात अनेक वेळा निर्देश देण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात अमलात आलेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
ग्रामीण विकासात आपला मोठा वाटा असल्याचे अधोरेखित करत महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले की, राज्यातील 38,805 गावे उघड्यावर शौचालय मुक्त घोषित करण्यात आली आहेत, तर 14,472 गावे ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत प्रमाणित झाली आहेत.
फेब्रुवारी महिन्यातही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते, मात्र त्यानंतर परिस्थितीत कोणताही सुधारणा झाली नसल्यामुळे सध्या असहकार आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. या आंदोलनाअंतर्गत कर्मचारी अधिकृत बैठका, अहवाल सादरीकरण आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मर्यादित सहभाग घेत आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास मे महिन्यापासून आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देत आंदोलन काळात पगार कपात होऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांनी काही संरचनात्मक अडचणींकडेही लक्ष वेधले आहे. मानधनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद नसणे, तसेच SNA SPARSH प्रणालीमुळे वेतन जमा होण्यात 15 ते 20 दिवसांचा विलंब होणे, या प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देयकांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व पेमेंट एकाच विभागाखाली एकत्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
थकीत देयके, कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण आणि प्रलंबित प्रशासकीय सुधारणा याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष रामकांत गायकवाड यांनी केली आहे.
Comments are closed.