दिवा विझताना मोठा होतो, एनडीएच्या पतनाची ही सुरुवात! पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी अशा पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती आले असून पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाच्या संदर्भात बोलताना ‘दिवा विझताना मोठा होतो. पश्चिम बंगाल जिंकला एक वात जास्त पेटली. एनडीएच्या पतनाची ही सुरुवात असं मी मानतो’; अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जिंकले पश्चिम बंगाल, जिंकले आसाम, तरी त्यांना देश चालवणं सोप्पं नाहीये’, असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे कल हाती आल्यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दात उत्तरे दिली. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर बोलताना ते म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं पश्चिम बंगाल स्वप्न जिंकण्याचं स्वप्न होतं, त्याप्रमाणे भाजप पश्चिम बंगालची सत्ता घेताना दिसत आहे. हे त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मोदी, शहा यांचं राष्ट्रीय स्तरावरचं कार्य संपलेलं दिसत आहे’.
‘द्वेष, धर्मांधता, SIR या सगळ्या माध्यमांतून ममता बॅनर्जी यांचा विजय रोखण्यात आला. ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे. आज भाजप विजय मिळवताना दिसतो आहे, हा विजय सरळमार्गाने मिळवलेला नाही, असं राऊत यांनी म्हटलं.
‘गेल्या वर्षभरामध्ये एनडीएने असं काय महान काम केलं आहे हे कुणी सांगू शकेल का? त्याचा सत्कार करेन’, असं म्हणत त्यांनी एनडीएला लक्ष्य केलं. देशासमोर उभे असलेल्या प्रश्नांचा पाढा वाचत त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजपचा हा विजय म्हणजे घोटाळा असल्याचा आरोपही केला. ‘प्रचंड महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, गॅस सिलिंडर मिळत नाहीये, नोकऱ्या उपलब्ध नाहीत, जगात देशाची मानहानी सुरू आहे, पंतप्रधानांची मानहानी सुरू आहे, मणिपूर पेटलेलं आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, तरीही लोक मतदान करतात असं चित्र निर्माण केलं जातं तेव्हा हा घोटाळा आहे. हा विजय सरळ मार्गाने मिळालेला नाही हे स्वीकारलं पाहिजे’, असं राऊत यावेळी म्हणाले.
अन्य राज्यांच्या निवडणूक निकालावर बोलताना ‘केरळमध्ये काँग्रेसला प्रचंड यश मिळालं आहे. एक राज्य काँग्रेसकडे आले आहे. आसाममध्ये भाजप जिंकलं आहे तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तमिळनाडूमध्ये TVK नावाच्या एका पक्षाला लोकांनी मतदान केलेलं आहे. ज्यांना राजकारण किंवा समाजकारणाचा कोणताही अनुभव नाही. पण डीएमके आणि एआयडीएमके या दोघांपेक्षा लोकांनी एका अभिनेता विजय थालपती याला मतदान केलं आहे. पण ती विधानसभा त्रिशंकू आहे. तिथे कुणाला बहुमत मिळालेले नाही’, असंही राऊत यांनी सांगितले.
आलेल्या निकालांचा आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्याचा काही संबंध नसून ९२ लाख मतं पश्चिम बंगालमधून डिलिट करण्यात आली त्याचा हा परिणाम आहे, असं राऊत यांनी ठामपणे सांगीतलं. भाजप पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही.पण भाजप आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला, असं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळतं आहे याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मार्मिक टोला लगावला.
Comments are closed.