महासंघ बरखास्त करा, नाहीतर कुस्ती संपेल! विनेशच्या समर्थनार्थ महावीर फोगाट मैदानात उतरले
ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाट हिने राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करताच, तिचे काका अन् प्रशिक्षक महावीर फोगाट यांनीही आता तिच्या समर्थनार्थ शड्डू ठोकलाय. कुस्ती महासंघ हा काहींच्या खिशातील खेळणं बनला आहे, असा घणाघाती आरोप करीत त्यांनी हा महासंघच बरखास्त करण्याची थेट मागणी केली आहे.
विनेशचा थेट आरोप
दरम्यान, विनेश फोगाट हिनेही आपल्या व्हिडीओतून संताप व्यक्त करत ‘सर्व काही आधीच ठरलेले असते. कोण जिंकेल, कोण हरेल हे मैदानावर नव्हे, तर बाहेर ठरते,’ असा धक्कादायक आरोप केला. ‘सरकार आणि क्रीडा मंत्रालय फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. आम्हा खेळाडूंना न्याय कोण देणार?’ असा सवालही तिने उपस्थित केला. त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरची लढाई आता केवळ पदकांसाठी नाही, तर न्याय आणि सन्मानासाठीदेखील पेटली आहे.
गोंड्यातील स्पर्धा की 'फिक्सिंग'चा अड्डा?
ब्रिजभूषण शरण सिंह यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवरूनही महावीर फोगाट यांनी संताप व्यक्त केलाय. ‘दिल्लीसारख्या ठिकाणी सर्व सुविधा असताना स्पर्धा गोंड्यातच का? हा योगायोग नाही, तर नियोजनबद्ध डाव आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘ कुस्ती महासंघ हा ब्रिजभूषण यांच्या हातातील बाहुले आहे. जिथे आयोजकच संशयाच्या भोवऱ्यात आहेत, तिथे खेळाडूंना न्याय मिळेल का?’ असा जाहीर सवाल त्यांनी उपस्थित केला. महावीर फोगाट यांनी थेट केंद्र सरकारलाच धारेवर धरले. ‘जर खरंच बदल हवा असेल तर संपूर्ण महासंघ बरखास्त करा. नाहीतर हा कुस्तीचा खेळ नव्हे, तर भ्रष्टाचाराचा बाजार बनेल,’ असा इशारा त्यांनी दिला.
Comments are closed.