IPL 2026 – मुंबईला विजयाचे ऑक्सिजन, पराभवाच्या हॅटट्रिकनंतर मुंबईचा वानखेडेवर विजय; रायन रिकल्टन-रोहित शर्माची झंझावाती शतकी भागी
सात पराभवांमुळे खचलेल्या मुंबईला अखेर रायन रिकल्टन आणि जोरदार कमबॅक करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माची झंझावाती खेळी आणि भागीच्या जोरावर विजयाचे ऑक्सिजन लाभले. मुंबईने लखनौचे 229 धावांचे आव्हान वानखेडेवर षटकारबाजी करत आठ चेंडू आधीच गाठले. या विजयामुळे मुंबई नवव्या आणि पराभवाने लखनौ दहाव्या स्थानवरच कायम राहिली आहे. 32 चेंडूंत लखनौची गोलंदाजी उद्ध्वस्त करणारा रिकल्टनचा मॅचविनर ठरला.
लखनौच्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिकल्टन आणि शर्मा जोडीने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे लखनौची गोलंदाजी उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर मुंबईला विजयापासून रोखणे लखनौच्या हातातून निसटले. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने निराश केले, पण नमन धीर (23)आणि विल जॅक्सने (10) फार वेळ न दवडता आठ चेंडू आधीच मुंबईला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला.
रिक्लेटन–रोहित धुवांधार
आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाताविरुद्ध 148 धावांची भागी करणारी रायन रिकल्टन-रोहित शर्माच्या जोडीने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने धुवांधार सलामी दिली. आजही दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह 143 धावांची भागी रचत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यंदाच्या आयपीएलमधील ही आठवी शतकी भागी ठरली. मात्र दोन्ही सलामीवीरांनी पन्नाशी गाठण्याची ही पाचवीच वेळ आहे. दोघांनी 10.5 षटकांतच 143 धावांची भागी रचली. मात्र दोघांचेही शतक हुकले. रायनने 8 षटकारांसह 32 चेंडूंत 83, तर रोहितने 7 षटकारांसह 44 चेंडूंत 84 धावा ठोकल्या.
पूरनला सूर गवसला
रॉकेट शॉट मारण्यात एक्सपर्ट असलेल्या निकोलस पूरनला अखेर सूर गवसला. यंदाच्या आयपीएलमधील सर्वात फ्लॉप खेळाडू ठरलेल्या पूरनने गेल्या आठ सामन्यात 9, 22, 9,1,19, 13, 1, 8 अशा अपयशी खेळ्या केल्या होत्या. मात्र आज त्याने आपल्या लौकिकास साजेशी फटकेबाजी करत 7 षटकार आणि 1 चौकारांसह 16 चेंडूंतच अर्धशतक ठोकले. त्याने मिशेल मार्शच्या साथीने 34 चेंडूंत 94 धावा ठोकल्यामुळे लखनौने 8 षटकांत 123 धावा केल्या. मात्र बॉशने एकाच षटकात पुरन (63)आणि मार्शची (44) विकेट काढली.
मुंबईने लखनौला रोखले
11 षटकांत 155 धावा चोपून काढणाऱ्या लखनौच्या डावाला नंतर ब्रेक लागला. रघु शर्माच्या अचूक माऱ्यामुळे लखनौला 4 षटकांत 20 धावांच काढता आल्या. तसेच शेवटच्या तीन षटकांतही लखनौला रोखण्यात चहर-बुमराला यश आले. त्यामुळे पहिल्या 10 षटकांत 141 धावा करणाऱ्या लखनौला पुढील 10 षटकांत 87 धावाच काढता आल्या. तळाला हिंमत सिंगने नाबाद 40 धावा काढल्या. बुमराला आणखी एका सामन्यात विकेटशून्य कामगिरीला सामोरे जावे लागले.
14 गुणांवरही प्ले ऑफ गाठलेय…
मुंबईने पुढील सर्व पाचही सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होणार आणि इतक्या गुणांवर प्ले ऑफ गाठणे कठीण मानले जात आहे. मात्र आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा हा कठीण पराक्रम केला गेला आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सने 14 गुण मिळवत नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफ गाठले होते. 2010 साली तर चेन्नई आणि आरसीबीने 14 गुणांसह प्ले ऑफमध्ये जागा मिळवली होती. याच वर्षी चक्क 4 संघांचे 14 गुण झाले होते आणि नेट रनरेटवर पोहोचलेल्या चेन्नईने आपली पहिली ट्रॉफी जिंकली होती. मुंबईनेही 2014 च्या मोसमात 14 गुणांसह प्ले ऑफमध्ये धडक मारली होती. विशेष म्हणजे, या हंगामात मुंबई सलग पाच सामन्यात पराभूत झाली होती. यावेळीही मुंबई सलग चार सामन्यांत पराभूत झालीय. त्यानंतर 2018 च्या हंगामात राजस्थानसुद्धा 14 गुणांनिशी प्ले ऑफला पोहोचली. मग 2019 मध्ये हैदराबादने, तर 12 गुणांसह प्ले ऑफ गाठले होते. 2020 मध्ये हैदराबाद आणि आरसीबीने नेट रनरेटवर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. 2021च्या हंगामात कोलकाताही 14 गुणांसह प्ले ऑफ खेळला होता. पण 2021 पर्यंत आयपीएलमध्ये आठ संघ खेळत होते आणि 2022 पासून त्याचे दहा संघ झाले आहेत. त्यामुळे 14 गुणांवर मुंबईसाठी प्ले ऑफ गाठणे तूर्तास तरी कठीणच वाटतेय.
Comments are closed.