पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; तीन मुले जखमी, बालक गंभीर सावरोलीतील ग्रामस्थांमध्ये घबराट
पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका बालकासह तीन मुले जखमी झाल्याची घटना सावरोली गावात घडली आहे. एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने तीन मुलांचे लचके तोडल्यामुळे सावरोलीतील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. जखमी मुलांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या बालकाला अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ सावरोली गावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रंदिवस गावात कुत्र्यांचे गँगवॉर सुरू असते. गावाच्या चौकाचौकात कुत्र्यांच्या मोठमोठ्या टोळ्या नेहमीच एकमेकांवर हल्ला करतात. त्यामुळे जखमी झालेले काही कुत्रे पिसाळले आहेत. अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तीन मुले जखमी झाले. पिसाळलेल्या कुत्र्याने एका मुलाच्या तोंडाला चावा घेतला. दुसऱ्या मुलाच्या कानाचा लचका तोडला, तर तिसऱ्या मुलाच्या पायाला चावा घेतला आहे. या हल्ल्यात हे तिन्ही मुले गंभीर जखमी झाले आहे. एका बालकाच्या तोंडाला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेला एक मुलगा हा आपल्या नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आला होता. तो कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
आदिवासी मुलाच्या चेहऱ्याचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या मुलावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या मुलाच्या चेहऱ्याला झालेल्या जखमांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
Comments are closed.