ज्ञानेश्वर नगरवासीयांचा घामटा निघाला, महावितरणचा डीपी जळल्याने रात्री १२ तास विद्युत पुरवठा खंडित
ठाणे महापालिकेच्या प्रभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नगरसेवक क्रमांक १३ मधील संत ज्ञानेश्वर नगर परिसरातील रहिवाशांचा रात्रभर घामटा निघाला. महावितरणचा डीपी जळल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्री सुमारे २ वाजता डीपीला अचानक आग लागली. त्यानंतर दुपारी २ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे संत ज्ञानेश्वर नगर, डॉ. गंगाधर नगर परिसरात तब्बल १२ तास ब्लॅकआऊट होता.
वागळे इस्टेटमधील संत ज्ञानेश्वर नगर परिसरातील पोलिस चौकीजवळ महावितरणची डीपी आहे. या डीपीला सोमवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता अचानक आग लागली. या घटनेची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नगरसेवक शहाजी (गणेश) खुपसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ कार्यवाही करत पहाटे सुमारे ३.२० वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. मात्र डीपीला आग लागल्याने पहाटेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाला. यावेळी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सोमवारची पहाट जागून काढावी लागली
एकीकडे उकाड्याने हैराण झालेले नागरिक मध्यरात्री झोपेत असताना पंखे, कूलर आणि वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद झाल्याने त्रस्त झाले. दरम्यान, आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सोमवारची पहाट जागून काढावी लागली. विद्युत पुरवठा बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले घराबाहेर असलेल्या कट्ट्यावर झोपल्याचे चित्र दिसले.
Comments are closed.