ठाण्याच्या उड्डाणपुलावर पाच वाहने एकमेकांवर आदळली, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचले टेम्पोचालकाचे प्राण
कोरम मॉलसमोरील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी पाच वाहनं एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. या अपघातात एक टेम्पो चालक गंभीर जखमी झाला, पण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सतर्कता दाखवून तातडीने धाव घेतली आणि त्या चालकाला तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. साजिर मेहबूब शेख असे त्याचे नाव आहे.
ठाण्यातील द्रुतगती महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. आज दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनाने कोरम मॉलजवळ अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणारी चार ते पाच वाहनं एकमेकांवर आदळली. या घटनेत टेम्पो चालक साजिर मेहबूब शेख हा आतच अडकला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या अपघाताची माहिती मिळताच वागळे इस्टेट वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा कोकणी, कोपरी शाखेचे अधिकारी दिलीप पाटील यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. त्यांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले.
Comments are closed.