हार्दिक पांड्या मैदानात परतणार की नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट
आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (४ मे) मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सशी भिडले. या सामन्यात एमआयचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले. स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी एमआयने हा सामना जिंकला, मात्र संघाच्या चिंतेत वाढ झाली. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे सामन्याला मुकला. त्याच्या दुखापतीबद्दल संघाच्या एक खेळाडूने माहिती दिली आहे.
एमआयचा सलामीवीर रायन रिकल्टनने हार्दिकच्या दुखापतीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली आणि तो लवकरच पुनरागमन करण्याची आशाही व्यक्त केली. एलएसजीविरुद्धच्या सामन्यानंतर तो बोलताना त्याने सांगितले की त्याला पांड्याच्या दुखापतीबद्दल नुकतेच कळाले आहे.
“तो कधी परत येईल हे मला माहित नाही, मात्र मला दुपारी समजले की त्याच्या पाठीत तीव्र क्रॅम्प्स येत आहेत. त्यामुळे त्याची तीव्रता किती हे मला माहित नाही, मात्र या आठवड्यात आम्ही रायपूरला जात असताना तो पुन्हा संघात परणार अशी मला खात्री आहे”, असे रिकल्टनने म्हटले आहे.
एलएसजीविरुद्ध नाणेफेकीसाठी आला असता प्रभारी कर्णधार सूर्यकुमारने पांड्याच्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, “आज रात्री हार्दिकची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी त्याची जागा घेणार आहे.”
तसेच फ्रॅंचायजीनेही एक निवेदन जाहीर केले होते. त्यात लिहिले, ‘हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे सामन्याला मुकणार असून आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार आहे.’
पांड्यासाठी हा हंगाम आव्हानात्मक ठरत आहे. त्याने २० च्या सरासरीने १४६ धावा केल्या असून केवळ ४ विकेट्स घेण्यात त्याला यश आले. नेतृत्वातही तो काही खास कामगिरी करत नाहीये.
सामन्याचे पाहिले तर एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना एमआयला २२९ धावांचे लक्ष्य दिले होते. यजमानांनी उत्तम सुरूवात केली. रिकल्टनने ३२ चेंडूत ८३ धावा आणि रोहित शऱ्माने ८४ धावा केल्याने संघाने १८.४ षटकांतच लक्ष्य गाठले. त्यामुळे संघाच्या प्लेऑफच्या आशा अजुनही जिवंत आहेत.
Comments are closed.