सावर्डे येथे भीषण साखळी अपघात, भरधाव ट्रकने 8 वाहनांना दिली धडक
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे नजीक असलेल्या खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे पंचामृत ढाब्यासमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव ट्रकने सलग सहा ते सात वाहनांना धडक डोक्याने भीषण अपघात घडला आहे. या साखळी अपघातात अनेक जण किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हयालाल मोतीलाल (रा. राजस्थान) हा चालक आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. आरजे-१९-जीएच-८४०३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या भरधाव ट्रकने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे चालवत प्रथम एका इनोव्हा गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेच्या वेगामुळे इनोव्हा गाडी फिर्यादी चैतन्य बेंगळे यांच्या बीएमडब्ल्यू कारवर आदळली आणि त्यानंतर ही साखळी धडक पुढे जात रिक्षा, आयशर ट्रक, बोलेरो पिकअप आणि इतर दोन ट्रकांना बसली. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू, इनोव्हा, बोलेरो पिकअप आणि रिक्षा यांसह सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशांसह चैतन्य बेंगळे आणि त्यांचे मामा सेंटैंगो देवासगायम डेव्हीड हे किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करत जखमींना मदत केली. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी ट्रक चालक कन्हालाल मोतीलाल याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.