Palghar News – गावठी औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भोंदूबाबाला अटक
मासिक पाळी थांबत नसल्याने गावठी औषध देण्याच्या बहाण्याने 13 वर्षाच्या मुलीवर भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ही घटना घडली असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. शिवराम धापशी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची मासिक पाळी थांबत नसल्याने तिच्या भावाने भोंदू बाबा शिवराम धापशी याच्याकडे गावठी औषधासाठी 30 एप्रिल रोजी संपर्क साधला. त्यानुसार, आरोपी 3 मे रोजी इको गाडी घेऊन पालघर तालुक्यातील खुताडपाडा येथे पोहोचला.
आरोपीने पीडित मुलगी, तिचे नातेवाईक आणि साक्षीदाराला गाडीने रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात येथे नेले. तेथे पोहचल्यानंतर नातेवाईकांना गाडीतच बसण्यास सांगून औषध बनवण्यासाठी अल्पवयीन मुलीला रस्त्यालगतच्या जंगल परिसरात नेले. तेथे मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली. यानंतर पीडित मुलीला पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
घरी गेल्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ कासा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील करत आहेत.
अंधश्रद्धा आणि गावठी औषधांच्या नावाखाली घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ अॅक्शन घेत आरोपीला आज पहाटे बेड्या ठोकल्या.
Comments are closed.