मुंबईच्या विजयानंतरही सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व नाहीच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई इंडियन्सचा संघ गेले काही दिवस विजयाचा दुष्काळ अनुभवत होता. पण मुंबईचा कर्णधार बदलला आणि त्यांचे नशीबही फिरले. कारण हार्दिक पंडय़ाच्या जागी सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या संघाचे नेतृत्व आले आणि संघ विजयाच्या मार्गावर परतला. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय साकारला, संघाला संजीवनी मिळाली, ते प्ले ऑफच्या रेसमध्ये परतले, पण तरीही सूर्यकुमारकडे कर्णधारपद देणार नसल्याची माहिती मुंबई इंडियन्समधील सूत्रांनी दिली.

मुंबईकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण…

मुंबईने यंदाच्या हंगामात पहिल्याच सामन्यात विजय मिळवून इतिहास रचला होता. चाहत्यांच्या संघाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. पण त्यानंतर सलग चार सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईने त्यानंतर सहावा सामना जिंकला खरा, पण त्यानंतर पुन्हा तीन सामने त्यांना गमवावे लागले. त्यामुळे नऊ सामन्यांत फक्त दोनच विजय त्यांच्या नावावर होते. त्यामुळे हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वावर सडकून टीका केली जात होती. पण लखनौविरुद्धच्या गेल्या सामन्यात हार्दिक खेळला नाही आणि संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आले. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने लखनौवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सूर्यकुमारच मुंबईचा कर्णधार होईल, अशा चर्चांना सुरुवात झाली होती.

मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाबाबत भूमिका केली स्पष्ट

मुंबई इंडियन्समधील सूत्रांनी सांगितले की, ‘मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या मार्गावर परतला आहे, आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने हा विजय मिळवला म्हणून यापुढे त्याच्याकडेच संघाची धुरा सोपवली जाईल, अशा चर्चांना उत आला आहे. पण कर्णधारपदासाठी हार्दिकच्या नावालाच संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. त्यामुळे सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय मिळवला असला तरी जेव्हा हार्दिक संघात येईल तेव्हा तोच मुंबईचा कर्णधार असेल.’

सूर्या आणि तिलक अपयशीच…

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्यांना तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे, असे या दोघांना मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने सुनावले आहे. त्यामुळे या दोघांसाठी पुढचे चारही सामने महत्त्वाचे असणार आहेत.

Comments are closed.