ओम साईश्वर आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर अजिंक्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओम साईश्वर सेवा मंडळ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर (अ) यांच्या दमदार खेळाने माटुंग्यातील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर आयोजित किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत बाजी मारली.

अंतिम सामन्यांमध्ये खो-खोचा अस्सल वेगवान थरार अनुभवायला मिळाला. किशोर गटाच्या अंतिम फेरीत ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर 4-3 असा निसटता विजय मिळवत अजिंक्यपद संपादले. श्रातिक गामी, आरव साटम आणि अधिराज गुरव यांनी महत्त्वाची कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. ओम समर्थकडून निहाल शिंदे आणि सहकार्यांनी जोरदार लढत दिली, पण त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

किशोरी गटात श्री समर्थ व्यायाम मंदिर (अ)ने आर्य सेना संघावर 14-4 असा एकतर्फी विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. खुशी यादवने आक्रमक खेळ करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली, तर ग्रंथा वारघडे, मनवा सावंत आणि आस्था महाडिक यांनीही उत्कृष्ट साथ दिली.

तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात किशोर गटात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विजय मिळवला, तर किशोरी गटात शिवनेरी सेवा मंडळ विजयी ठरले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून श्रातिक गामी आणि खुशी यादव यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट संरक्षक म्हणून निहाल शिंदे आणि ग्रंथा वारघडे, तर उत्कृष्ट आक्रमक म्हणून अधिराज गुरव आणि दक्षता घोलप यांची निवड करण्यात आली.

Comments are closed.