ममता बॅनर्जी यांचा पदत्यागास नकार – TMarathiNews

तृणमूल काँग्रेसचा ‘नैतिक विजय’ झाल्याचा दावा : केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतरही पदत्याग करण्यास नकार दिला आहे. या निवडणुकीत आमचा पराभव झालेलाच नाही. त्यामुळे पदत्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वक्तव्य त्यांनी मंगळवारी कोलकाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून एकच खळबळ उडवून दिली.

या निवडणुकीत आमचा संघर्ष भारतीय जनता पक्षाशी नव्हे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाशी होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला अनुकूल ठरेल, अशी भूमिका घेतली. आम्ही हरलेलो नाही. आम्हाला हेतुपुरस्सर हरविण्यात आलेले आहे. तृणमूल काँग्रेसचा या निवडणुकीत नैतिक विजय झालेला आहे. त्यामुळे मी राज्यपालांकडे त्यागपत्र देण्यासाठी जाणार नाही. आम्ही पराभव मान्य केलेलाच नाही, असेही प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांसमोर केले.

मतगणनेत मोठा घोटाळा

मतगणनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. किमान 100 मतदारसंघांमध्ये आमची मते कमी करण्यात आली. अन्यथा आमचा विजय निश्चित होता. आमची मते ‘लुटण्यात’ आली. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये मतगणना प्रक्रिया हेतुपुरस्सर मंदगतीने करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे आमचा खऱ्या अर्थाने पराभव मुळात झालेलाच नाही, असे म्हणणे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

आयोगाविरोधात कारवाई करणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीत अनेक घटनाबाह्या आणि अधिकारबाह्या प्रकार केलेले आहेत. आम्ही त्यांची सविस्तर माहिती घेत आहोत. निवडणूक प्रक्रिया आणि मतगणना प्रक्रिया मनमानी पद्धतीने चालविण्यात आली. अनेक नियमबाह्या बाबी स्वीकारण्यात आल्या. याचा फटका आम्हाला बसला. आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. मात्र, त्यासाठी आम्हाला अधिक माहिती संकलित करावी लागणार असून ते काम करण्यात येत आहे. लवकरच यासंबंधी माहिती दिली जाईल, असे प्रतिपादनही बॅनर्जी यांनी केले आहे.

हिंसाचाराचा आरोप

निवडणुकीचे परिणाम घोषित केल्यानंतर राज्यात तृणमूल काँग्रेसची कार्यालये जाळण्यात आली आहेत. तसेच कार्यकर्त्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत. आम्ही 10 जणांची समिती स्थापन केली असून ही समिती हिंसाचार घडलेल्या प्रत्येक स्थानाला भेट देणार आहे. तसेच माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर पुढील कृती करण्यात येईल. आम्ही सज्ज आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. आमच्यापाशी पुरेसे आमदार आणि कार्यकर्ते आहेत. जर विरुद्ध बाजूने हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला आणि विशिष्ट जाती किंवा धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही ठोशास ठोसा या न्यायाने प्रत्युत्तर देणार आहोत, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.

त्यागपत्र दिलेच नाही तर…

ममता बॅनर्जी यांनी पदत्याग केलाच नाही, तर काय होईल, यावर काही विधीतज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्र्याने पदत्याग केला नाही, तर राज्यपाल भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 (1) अनुसार सरकार विसर्जीत करू शकतात. किंवा ते बहुमत असलेल्या पक्षाला किंवा युतीला थेट सरकार स्थापनेसाठी आमंत्रिक करू शकतात. तसेच बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्र्याला बहुमत सिद्धतेचा आदेश देऊ शकतात. सध्या ममता बॅनर्जी यांनी त्यागपत्र दिले नसले, तरी अंतिमत: ते द्यावेच लागेल, असे विधीतज्ञांचे मत आहे.

निवडणूक परिणाम आम्हाला अमान्य

ड निवडणुकीत पराभव झाला आहे, हे मान्य करण्यास बॅनर्जी यांचा नकार

ड कोणाच्याही दबावाखाली येऊन त्यागपत्र देणार नाही, असे केले स्पष्ट

ड मतगणनेनंतर तृणमूल काँग्रेस विरोधात हिंसाचार होत असल्याचा आरोप

Comments are closed.