मंत्रिमंडळ निर्णय- आदिवासी मुलांचे शिक्षण गतिमान होणार; 24 आश्रमशाळांची श्रेणी वाढवली, 19 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा
राज्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासी मुलांचे शिक्षण आता अधिक गतिमान होणार आहे. आदिवासींच्या आश्रमशाळांची श्रेणी वाढवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पाच प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक, तर 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढवून त्यांना उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यास तसेच माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये 18 ठिकाणी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि एका ठिकाणी केवळ 11 वी व 12 वी कला अशा 19 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
श्रेणीवाढ झालेल्या प्राथमिक आश्रमशाळांमध्ये आवश्यक शिक्षकांची 30 नियमित पदे व 25 बहुउद्देशीय कर्मचाऱयांची 25 पदे यांच्या पदनिर्मितीस तसेच 19 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आवश्यक 148 शिक्षकांच्या नियमित पदनिर्मितीस आणि सर्व पदांच्या आवश्यक खर्चाच्या तरतुदीसही बैठकीत मान्यता देण्यात आली.
सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यापैकी 37 प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा (इयत्ता 1 ली ते 7 वी) व 319 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा (इयत्ता 1 ली ते 10 वी) आहेत. माध्यमिक आश्रमशाळा संलग्न 200 कनिष्ठ महाविद्यालये (इयत्ता 1 ली ते 12 वी) सुरू आहेत. या शाळांमध्ये सुमारे 2 लाख 61 हजार 836 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सोलापूरला नवे सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज; एआय, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम सुरू होणार
सोलापूरकरांना नवे सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालय मिळाले आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे (पॉलिटेक्निक) नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी) असे करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यात यंदाच्या वर्षीपासूनच एआय अँण्ड मशिन लार्ंनग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे पदवी स्तरावरचे तीन नवे इंजिनीअरिंग अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत.
या तीन अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी साठ अशी असेल. त्यामुळे सोलापूर परिसरातील 180 विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश घेता येणार आहे. या नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेकरिता टप्पाटप्प्याने नियमित शिक्षकांची 39 पदे, तर 38 शिक्षकेतर पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. ती पदे तसेच संस्थेतील बांधकाम, यंत्रसामुग्री, उपकरणे यांसाठी आगामी चार सुमारे 157 कोटी 66 लाख दोन हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती, डागडुजी तसेच अन्य आवश्यक खर्चाकरिता 11 कोटी रुपयेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तुळजाभवानी इंजिनीअरिंग कॉलेज शासनाकडे हस्तांतरित
तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नावाने ओळखले जाईल.
तुळजापूर येथील तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांनी संस्थांनामार्फत चालविले जाणारे हे महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यानुसार महाविद्यालयाची जागा, इमारत आणि साहित्यासह शासनाकडे हस्तांतरित करण्यास आज मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयासाठी नियमित शिक्षकांची 60, शिक्षकेतर 58 अशा 118 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी सध्या संस्थांनाचेच कर्मचारी म्हणून राहणार आहेत.
या महाविद्यालयात सिव्हील (स्थापत्य) मेपॅनिकल (यंत्र अभियांत्रिकी), इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन (अणुविद्युत व दूरसंचार) आणि कॉम्प्युटर सायन्स (संगणक विज्ञान) असे अभ्यासक्रम सुरू आहेत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, ईव्ही टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
Comments are closed.