संजू सॅमसनच्या वादळी खेळीने दिल्ली कॅपिटल्सचा सुपडा साफ, चेन्नई सुपर किंग्जचा दणदणीत विजय
आयपीएल २०२६ च्या हंगामात ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने ८ विकेट्सने विजय मिळवला. डीसीने दिलेले १५६ धावसंख्येचे लक्ष्य सीएसकेने १७.३ षटकांत २ विकेट्स गमावून सहज पार केले. पाच वेळेचा विजेत्याचा चालू हंगामातील हा पाचवा विजय आहे, तर डीसीचा सहावा पराभव आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. सीएसकेच्या या विजयात पुन्हा एकदा संजू सॅमसनने उल्लेखनीय खेळी केली.
विकेटकीपर-सलामीवीर संजूने ५२ चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ८७ धावांची खेळी केली. त्याने कार्तिक शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. कार्तिकने ३२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड ६ धावा आणि उर्विल पटेल याने १७ धावा केल्या. लुंगी एन्गिडीवे चौथ्या षटकात सीएसकेला पहिला धक्का दिला. त्याने ऋतुराजला बाद केले. तसेच उर्विलला अक्षर पटेलने बाद केले.
या सामन्यात डीसीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल या सामन्यात मात्र लवकरच तंबूत परतला. त्याच्याबरोबर वरच्या फळीतील बाकी फलंदाजांनीही निराशा केला. राहुल (१२), पथुम निसांका (१९), नितीश राणा (१५) आणि करूण नायर (१३) हे सर्व स्वस्तात बाद झाले. अक्षरही २ धावा करत विकेट गमावून बसला. त्यामुळे यजमानांची स्थिती १०.६ षटकांत ५ विकेट्स गमावून ६९ धावा अशी झाली होती. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६५ (४७) धावांची भागीदारी केली. ही डीसीची या सामन्यातील एकमेव अर्धशतकी भागीदारी होती. त्यामुळे त्यांना १५० धावांचा टप्पा गाठता आला.
सीएसकेकडून सर्वाधिक विकेट्स नूर अहमदने घेतले. त्याने ३ षटकांत २२ धावा देत राणा आणि नायर यांना बाद केले. अकील होसैनने ४ षटकात १९ धावा देत राहुलला बाद केले. तत्पूर्वी मुकेश चौधरीने डीसीला सुरूंग लावला. त्याने निसांकाला बाद करत सीएसकेला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने ४ षटकांत ३१ धावा दिल्या. तसेच गुरजपनीत सिंग आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. अंशुल कंबोज महागात पडला. त्याने ४ षटकांत ४९ धावा देत एकही विकेट घेतली नाही.
या विजयाने सीएसके गुणतालिकेत सहाव्या स्थानी तर डीसी सातव्या स्थानी आहेत.
Comments are closed.