बीडमध्ये दुचाकीला कंटेनरची धडक, लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू; चिमुकलीही जखमी
बीड: सध्या लगीनसराईला सुरुवात झाली असून ज्यांची घरी लग्न आहे, त्यांच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. बाजारातून जाऊन खरेदीसाठी पै पाहुण्यांसह कुटुंबीयही गुंतलं आहे. एकीकडे घरात लग्नसराईचा आनंद असताना बीडमध्ये (Beed) कुटुंबातील महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दुचाकीवरून जात असताना कंटेनरने चिरडल्याने अपघातात (Accident) एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला. तसेच, वाहनचालकास पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलंय.
बीड शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात ही घटना घडलीय. कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी चालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्रतिभा चौधरी असे मृत महिलेचे नाव असून त्या लग्नाच्या खरेदीसाठी सुभाष रोड येथील बाजारपेठेत चालल्या होत्या. याच दरम्यान दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कंटेनर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे, दुचाकी कंटेनरच्या टायरखाली आल्यानं प्रतिभा चौधरी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील चिमुकली बचावली आहे. मात्र, ती देखील जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कंटेनर चालकावर पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
केजमध्ये टिप्परचालकास बेदम मारहाण, उपचारावेळी मृत्यू
बीडच्या केज तालुक्यात सुर्डी फाटा येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एका टिप्पर चालकाला काठीने केलेल्या बेदम मारहाणीत एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय.सुर्डी येथील खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असलेले खुशालराम बलभीम ठोंबरे वय (55 वर्ष) याचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या मंगेश भरत माने वय (45वर्ष) याच्या कुटुंबासोबत 4 मे रोजी रात्री भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात धरुन 5 मे रोजी दुपारी 2 वा. ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या मंगेश भरत माने याने खुशालराम बलभीम ठोंबरे हे केज-कळंब रोडवरील सुर्डी फाट्यावरील हॉटेलमध्ये बसलेले असताना रात्रीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या खुशालराम ठोंबरे यांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत घोषित केले. मयत टिप्पर चालकाचा मुलगा बालाजी खुशालराम ठोंबरे यांच्या फिर्यादी वरून मंगेश भरत माने याच्या विरुद्ध गु. र. नं. १२४/२०२६ भा. न्या. सं. १०३(१) नुसार युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी भरत माने याला ताब्यात घेतले घेतले असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
Comments are closed.