नागपूर–तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; एसटी-ट्रकची समोरासमोर धडक, 16 प्रवासी जखमी
नागपूर–तुळजापूर महामार्गावरील सातारा फाट्याजवळ बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. यवतमाळहून आर्णीकडे जाणारी नागपूर–दिग्रस एसटी बस आणि अज्ञात ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचा चालक स्टेअरिंगमध्ये अडकून पडला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत सुमारे अर्धा तास प्रयत्न करून चालकाची सुटका केली. या अपघातात चालक व वाहक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने आर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निरगुडकर, जमादार सतीश चौधर, तसेच पोलीस शिपाई अतुल पवार व संदीप देंगे यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली.
पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवत फरार ट्रकचालक संजय कुमार कैलास प्रसाद वर्मा (45) याला ताब्यात घेतले. अपघातग्रस्त ट्रकही जप्त करण्यात आला आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.