दहतशवादाचा पूर्ण नि:पात करणारच – TMarathiNews
‘सिंदूर अभियान’ प्रथम वर्षपूर्तीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार, निर्णायक संघर्ष केला जाणारच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘दहशतवादाचा पूर्ण नि:पात करणे, हा आमचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य केल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ‘सिंदूर अभियान’ कार्यवाहीच्या प्रथम वर्षपूर्तीदिनानिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात त्यांनी भारतीय सेनादलांचे साहस, पराक्रम आणि समयसूचकता, यांची प्रशंसा केली आहे. भारतीय सेना दलांच्या अद्वितीय रणकौशल्याचा परिचय साऱ्या जगाला या अभियानाच्या माध्यमातून घडला, अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या.
दहशतवादाविरोधात भारताने अवलंबिलेले कठोर धोरण आणि देशाच्या सुरक्षेचा अतूट सकल्प यांचे ‘सिंदूर अभियान’ हे प्रतीक आहे. या अभियानाच्या माध्यमातून भारताच्या सेनादलांनी अपूर्व पराक्रम, रणकौशल्यातील व्यावसायिकता आणि बेजोड पूर्वसज्जता यांचे दर्शन साऱ्या जगाला घडविले. त्यासमवेतच, भारत संरक्षण क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे देखील या अभियानाने सिद्ध केले. आज ‘सिंदूर अभियाना’ला एक वर्ष पूर्ण होत असताना भारत दहशतवाद आणि त्याला चालविणाऱ्यांचे पूर्ण तंत्र यांचा समूळ नायनाट करण्यासाठी बळकटपणे प्रतिबद्ध आहे, हे जगाने ध्यानात घ्यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अमित शहा यांच्याकडून प्रशंसा
या अभियानाच्या वर्षपूर्तीदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भारताच्या सेनादलांचे अतुलनीय साहस आणि शौर्य यांची प्रशंसा केली आहे. ‘सिंदूर अभियान’ नेहमीच भारताच्या शत्रूंना भारतीय सेनादलांच्या अचूक मारक क्षमतेचे स्मरण करुन देत राहील. भारतीय सेनादलांचा पराक्रम आणि भेदक्षमता तसेच भारतीय गुप्तचर संस्थांनी पुरविलेली सूक्ष्म माहिती आणि भारताची बळकट राजकीय इच्छाशक्ती यांचा संयुक्त परिपाक, याचा अर्थ हे अभियान असा आहे, असे अमित शाह यांनी त्यांच्या ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या संदेशात स्पष्ट केले.
‘सिंदूर अभियाना’ला एक वर्ष पूर्ण
22 एप्रिल 2025 या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी भीषण दहशतवादी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या होत्या. एकंदर, 26 निरपराधी पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. भारताने पुढच्या 15 दिवसांमध्ये या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना पाकिस्तामधील 9 दहशतवादी तळांना अचूकपणे लक्ष्य केले होते. भारताच्या या कार्यवाहीत 100 हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षिक मारले गेले होते. कुख्यात दहशतवादी मसूद अझर याचे जवळपास सर्व कुटुंबीयही या कार्यवाहीत मारले गेले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे भारतीय वायुदलाने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानातील 13 वायुतळांवर क्षेपणास्त्रे डागली होती. भारताच्या या आघातामुळे हे तळ नष्ट झाले होते. 10 मे 2025 या दिवशी पाकिस्तानने जेरीस येऊन विनंती केल्यामुळे भारताने शस्त्रसंधीस मान्यता दिली होती. मात्र, ‘सिंदूर अभियान’ पुढे होतच राहील, असे स्पष्ट केले होते. याच काळात भारताने पाकिस्ताशी असणारा सिंधू जलवितरण अनुबंधही स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आजही हा अनुबंध स्थगित स्थितीतच आहे.
पाकिस्तानला जबर तडाखा
‘सिंदूर अभियाना’द्वारे भारताने पाकिस्तानला जबर तडाखा देऊन त्याची खरी जागा दाखवून दिली आहे. नंतर पाकिस्तानने बऱ्याच प्रमाणात अपप्रचार करुन या संघर्षात आपलीच सरशी झाल्याचा बनाव रचत आपल्याच जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तथापि, प्रत्येक वेळी त्याला या अपप्रचार कारस्थानात माघार घ्यावी लागली. ‘सिंदूर अभियाना’त भारतच श्रेष्ठ ठरला आहे, हे जगातील प्रत्येक संरक्षण तज्ञाने मान्य केले आहे. तसेच भारताच्या संरक्षणसिद्धतेची प्रशंसाही केली आहे. भारतातील विरोधी पक्षांनी ‘सिंदूर अभियाना‘संबंधी संशय व्यक्त करण्याचा करंटेपणाही केला होता. तथापि, भारताच्या जनतेने आपल्या सैन्यदलांवर आणि केंद्र सरकारवरच आपला विश्वास असल्याचे दर्शवून दिले आहे.
भारताचा पराक्रम, पाकिस्तानचा भेकडपणा
ड ‘सिंदूर अभियान’ हे भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमाचे अजरामर प्रतीक
ड या अभियानात पाकिस्तानची झाली प्रचंड हानी आणि येथेच्छ नाचक्की
ड फजिती लपविण्यासाठी पाकिस्तानने केलेला अपप्रचारही त्याच्या अंगाशी
Comments are closed.