सुवेंदूच्या पीएची बंगालमध्ये हत्या
तीन संशयित ताब्यात : पाठलाग करून गोळीबार : छातीत दोन गोळ्या घुसल्या
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी पाठलाग करत गोळीबार केल्याने रथ यांच्या छातीत दोन गोळ्या घुसल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारी तीन संशयित शार्पशूटरना अटक करण्यात आली. बारासात येथील रुग्णालयात शवविच्छेदनादरम्यान पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, चंद्रनाथ रथ यांच्या आई, हसिरानी रथ यांनी एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. ‘मला दोषींना शिक्षा हवी आहे. पण मी एक आईसुद्धा असल्यामुळे मला त्यांना फाशी द्यायची नाही. मला दोषींना जन्मठेपेची शिक्षा हवी आहे.’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या खळबळजनक हत्येमध्ये वापरलेल्या मोटरसायकलबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे. तपास यंत्रणांनी मोटरसायकलची नोंदणी कोणाच्या नावावर होती, हे देखील शोधून काढले आहे. या मोटरसायकलची मालकी पश्चिम बंगालमधील आसनसोल दक्षिण भागातील बर्नपूरशी संबंधित आहे. वाहन नोंदीनुसार, या बाईकच्या नोंदणी क्रमांकानुसार ती पश्चिम बंगालमधील पश्चिम बर्धमान आरटीओ कार्यालयात नोंदणीकृत आहे. कागदपत्रांनुसार मालकाचे नाव विभास कुमार भट्टाचार्य आणि वडिलांचे नाव बी. बी. भट्टाचार्य असे आहे. या बाईकची नोंदणी 4 मे 2012 रोजी झाली असून, ती 2 मे 2027 पर्यंत वैध आहे. आता याबाबत सखोल तपास सुरू आहे.
टीएमसीवर हत्येचा आरोप
चंद्रनाथ रथ यांची आई हसिरानी रथ यांनी टीएमसीवर हत्येचा आरोप केला. सुवेंदू बाबू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यापासून माझ्या कुटुंबाला अशा धमक्या मिळत आहेत. 4 मे नंतर दिल्लीतील गॉडफादरही त्यांना वाचवू शकणार नाहीत, अशी धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जर माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला असता, तर मला इतके दु:ख झाले नसते. गुंडांनी ज्या प्रकारे माझ्या मुलाची हत्या केली, त्यामुळे मी दु:खी आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
Comments are closed.