Yavatmal News – उकणी कोळसा खाणीत मातीचा डोंगर कोसळला; दोन डंपर गाडले, सुदैवाने चालक बचावले
यवतमाळ जिल्ह्यातील उकणी कोळसा खाणीत गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. अचानक मातीचा मोठा डोंगर आणि गाळयुक्त पाण्याचा लोंढा आल्याने दोन डंपर मातीखाली गाडले गेले. सुदैवाने चालकांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, उकणी कोळसा खाणीत उत्खननामुळे खोल खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढून वर तयार करण्यात आलेल्या शिल्डमध्ये साठवले जाते.
दरम्यान, पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना अचानक शिल्डला लावलेली भिंत सरकल्याने गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाली आला. काही क्षणांतच दोन डंपर मातीखाली गाडले गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खाण परिसरात एकच खळबळ उडाली.
डंपर चालकांनी प्रसंगावधान राखत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवला. घटनेनंतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सुरक्षा सप्ताहासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र प्रत्यक्ष कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते, असा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, या प्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.
Comments are closed.