तो जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल; थलपती विजयच्या ऐतिहासिक यशावर जेनेलियाची प्रतिक्रिया, जुन्या आठवणींना दिला उजाळा
दाक्षिणात्य सुपरस्टार चंद्रशेखरन जोसेफ विजय हा खऱ्या अर्थाने तामिळनाडूच्या राजकारणातील थलैवा ठरला आहे. दोन वर्षांपूर्वीच पक्ष स्थापन करून आखाड्यात उतरलेल्या विजयने निवडणूक जिंकली. त्याच्या या विजयानंतर सिनेसृष्टीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुख हिने विजयच्या या यशाचे मनापासून कौतुक केले असून, हा विजय म्हणजे तामिळनाडूच्या जनतेने त्याच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचे तिने म्हटले आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना जेनेलियाने विजयचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ती म्हणाली की, तामिळनाडूतील हा विजय म्हणजे तामिळनाडूच्या जनतेने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आहे.खरंतर त्याचा हा विजय म्हणजे तामिळनाडूच्या जनतेचा विजय आहे. विजय जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे, असे ती म्हणाली.
सोबतच तिने विजयसोबतच्या तिच्या कामाच्या अनुभवांनाही उजाळा दिला. या दोघांनी ‘सचीन’ (2005) आणि ‘वेलायुधम’ (2011) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विजय हा अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या कामाप्रती प्रचंड प्रेम असलेला व्यक्ती आहे, असे सांगत तिने त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे कौतुक केले. तो जे काही करतो, ते पूर्ण निष्ठेने करतो असेही जेनेलिया यावेळी म्हणाली.
थलपथी विजयची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता निवडणुकीतील मोठ्या यशानंतर केवळ त्याचे चाहतेच नव्हे, तर संपूर्ण सिनेसृष्टी त्याच्या आगामी राजकीय प्रवासाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. जेनेलियाप्रमाणेच इतर अनेक सेलिब्रिटींनीही त्याच्या या नवीन इनिंगला पाठिंबा दर्शवला आहे.
Comments are closed.