Ratnagiri News – जिल्ह्यात धुळीच्या वादळासह अवकाळी पाऊस; वीज खांब कोसळले, आंबा बागायतदारांचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी (9 मे) दिवसभर कडक उन्हाचा कडाका जाणवत असतानाच, सायंकाळी हवामानात अचानक बदल झाला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ घोंगावले आणि त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
सायंकाळी पाच वाजता शहरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही क्षणात धुळीचे लोट उठू लागले. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणचे पत्रे उडाले, तर दुकानांच्या पाट्याही कोसळल्या. धुळीमुळे नागरिकांच्या डोळ्यांना त्रास झाला असून शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. शनिवारचा बाजार असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि विक्रेत्यांची मोठी धावपळ उडाली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना आणि झाडांवर थोडाफार आंबा शिल्लक असतानाच हे वादळ आले. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडला असून बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रत्नागिरी शहराचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील आंबवली धनगरवाडी येथे विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून अनेक भागात रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
Comments are closed.