IPL 2026 – वेपिंगचा खेळ! यांना जेलमध्ये टाका, हेच जर सामान्य माणसाने केलं तर… टीम इंडियाचे माजी खेळाडू भडकले
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा ड्रेसिंग रूममधील वेपिंग करताना व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर युझवेंद्र चहलचा विमानातील वेपिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर BCCI ने रियान परागवर कारवाई केली, युझवेंद्र चहलमुळे अर्शदिप सिंगच्या व्लॉगिंगवर तात्पुरती बंदी आणली. मात्र, चहलच्या व्हिडिओबाबत अद्याप बोर्डाने अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. या सर्व प्रकारावर टीम इंडियाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सडकून टीका केली असून, अशा खेळाडूंना थेट जेलमध्ये टाका असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
युझवेंद्र चहलचा विमानातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशात वेपवर बंदी असेल, तर नियम मोडणाऱ्यांना तुरुंगातच असायला हवे,” असे त्यांनी म्हटले आहे. केवळ 25 टक्के दंड आकारणे ही अतिशय सौम्य शिक्षा असून, कायदा सर्वांसाठी समान असावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, हा व्हिडिओ अर्शदीप सिंगच्या पॉडकास्टशी संबंधित असल्याचे म्हटले जात असून, तो खरा आहे की त्यात फेरफार करण्यात आला आहे, याची अधिकृत खातरजमा झालेली नाही.
भारतात व्हेपवर बंदी आहे. तुरुंगाच्या मागे असावा. कायदे करून त्याची अंमलबजावणी न करण्यात काय अर्थ आहे. मॅच फीच्या 25% शेंगदाणे आहे. जर एखाद्या नियमित व्यक्तीने हे केले असेल तर काय कारवाई केली जाईल?
— लक्ष्मण शिवरामकृष्णन (@LaxmanSivarama1) 8 मे 2026
या सर्व प्रकारानंतर बीसीसीआयने आपल्या नवीन गाईडलाईन्समध्ये ई-सिगारेटचा विशेष उल्लेख केला आहे. बोर्डाच्या नव्या नियमांनुसार, टीम ड्रेसिंग रूम, सराव क्षेत्र आणि टीम हॉटेलमध्ये ई-सिगारेट किंवा कोणत्याही प्रतिबंधित पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूवर कठोर कायदेशीर आणि संघटनात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा बीसीसीआयने सर्व खेळाडूंना दिला आहे.
Comments are closed.