Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध स्लॅबचा भाग कोसळला, चालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे तिठा येथे महामार्गाचा स्लॅबचा मधला भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध मोठा स्लॅबचा भाग पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तातडीने कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, पंचायत समिती सहदेव खाड्ये यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बॅरिकेट लावण्यात आले आहे. तातडीने या महामार्ग उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Comments are closed.