Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यात वादळी पावसाचा तांडव; इमारतीचे पत्रे उडाले, वीज गायब, आंबा-काजू बागांचे नुकसान

संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आज (09 मे 2026) दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून आंबा आणि काजू बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मापारी मोहल्ला येथील मुस्लिम जमात इमारतीवरील पत्रे वादळामुळे उडून दूरवर फेकले गेले. यामुळे इमारतीच्या आत पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तसेच, संगमेश्वरच्या खाडी पट्ट्यात सुसाट वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तयार आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

वादळामुळे वीज यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. 33 केव्ही निवळी आणि आरवली या मुख्य वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने आणि कुरधुंडा येथे वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने अनेक गावे अंधारात आहेत. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कायम होता, ज्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments are closed.