सोलापुरातील करमाळा बसस्थानकावर महिलेचे 5 लाख 36 हजारांचे दागिने लंपास; बसमध्ये चढताना साधला डाव

सोलापूर करमाळा क्राईम न्यूज: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नकार्यासाठी आलेल्या एका महिलेचे तब्बल 5 लाख 36 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना करमाळा बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

नेमकी घटना कशी आली उघडकीस?

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती धनंजय पुजारी (वय 32, रा. अंकोली, ता. मोहोळ) या आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी करमाळा येथील एका मंगल कार्यालयात आल्या होत्या. त्या आपल्या गावी परतण्यासाठी करमाळा बसस्थानकावर आल्या.​ करमाळा-सोलापूर या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने स्वाती पुजारी यांच्या पर्सची चेन उघडून त्यातील दागिन्यांची डबी लंपास केली. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडी असल्याचे आणि दागिन्यांची डबी गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र दागिने मिळून आले नाहीत.

करमाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303 (2) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला

याप्रकरणी स्वाती पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303 (2) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अभिजित सुभाष मोहोळकर करत आहेत. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

घरफोडी करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील सांगावी येथील घरफोडी करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 148 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह एकूण 16 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  खरंतर उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने अनेक जण आपल्या गावी गेल्याचे दिसून येतं आहे, याचाच फायदा घेत बंद घरांची घरफोडी करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा येथे झालेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरीला गेले होते, दरम्यान या घटनेचा तपास करत असतांना ही चोरी आरोपी नितीन जाधव याने केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केल्यानंतर आरोपीने काही सोन्याचे दागिने सराफाला विक्री केले होते. तर काही दागिने लपून ठेवल्याची कबुली दिली होती त्यानुसार पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत केले आहे… आरोपी जाधव हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर सोलापूर आणि बीडमध्ये तब्ब्ल 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.