गुजरातचा जलवा कायम! राजस्थानचा 77 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या दिशेने मोठे पाऊल

आयपीएल 2026 च्या 52व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव करत गुणतालिकेत 14 गुणांसह थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व यशस्वी जयस्वाल याने केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गडी गमावत 229 धावांचा मोठा डोंगर उभा केला.

गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल याने 84 धावांची दमदार खेळी केली, तर साई सुदर्शन याने 55 धावांचे योगदान दिले. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद 37 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. राजस्थानकडून गोलंदाजीत ब्रजेश शर्मा याने 2 बळी घेतले, तर यश राज पुंजा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. 91 धावांवरच संघाचे पाच फलंदाज माघारी परतल्याने सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले. राजस्थानचा संपूर्ण संघ 16.3 षटकांत 152 धावांवर आटोपला.

राजस्थानकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 38 धावा केल्या, तर वैभव सूर्यवंशी याने 36 धावांची खेळी केली. गुजरातकडून गोलंदाजीत राशिद खान याने 4 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. तसेच जेसन होल्डर याने 3 बळी घेतले, तर कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे 2 आणि 1 गडी बाद केला.

या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत टाॅप 2 मध्ये दमदार प्रवेश केला आहे.

Comments are closed.