वाटवेंच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ भावगीत गायक-संगीतकार गोविंद पोवळे यांचे निधन
मराठी भावसंगीत क्षेत्रातील दिग्गज गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गोविंद पोवळे यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली होती आणि सात दशकांहून अधिक काळ त्यांनी रसिकप्रेक्षकांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध केले आहे. ‘माती सांगे कुंभाराला’, ‘रात्र काळी घागर काळी’, ‘गंगा आली रे अंगणी’ (संथ वाहते कृष्णामाई चित्रपट) ही त्यांची काही अतिशय लोकप्रिय गीते आहेत. त्यांनी 100 हून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे आणि स्वत: 25 ते 30 हून अधिक गाणी गायली आहेत.
गोविंद पोवळे त्यांचे कुटुंब पनवेलजवळील चिरनेरचे असून वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार होते. आई पार्वतीबाई यांनाही गाण्याची आवड होती. त्यामुळे गाण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. 1946-47 च्या सुमारास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रासाठी त्यांनी ऑडिशन दिली होती. त्यानंतर सलग 70 वर्षे आकाशवाणीवर गात राहिले.
Comments are closed.