तामिळनाडू अखेर विजयाच्या मार्गावर

वृत्तसंस्था/ चेन्नई

अभिनेता-राजकारणी विजय थलपती यांच्यासाठी तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री बनून सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. व्हीसीके आणि आययूएमएलने शनिवारी त्यांच्या टीव्हीके पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार असून त्यांच्या पाठिंब्याने विजय यांचा एकूण पाठिंबा 120 आमदारांपर्यंत पोहोचला आहे.

विजय यांना आता 120 आमदारांचा पाठिंबा आहे. विजय यांच्या टीव्हीकेकडे स्वत:चे 107 आमदार आहेत. याव्यतिरिक्त काँग्रेसचे पाच, तर सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीकेचे प्रत्येकी दोन असे एकूण सहा आमदार सामील झाले आहेत. ‘आययूएमएल’ म्हणजेच मुस्लीम लीगच्या दोन आमदारांनीही शनिवारी विजय थलपती यांना पाठिंबा जाहीर केला. तामिळनाडूमध्ये व्हीसीके व्यतिरिक्त आययूएमएलने टीव्हीकेसोबतही हातमिळवणी केली आहे. आययूएमएलने टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पक्षाने सायंकाळी टीव्हीकेला आपले पाठिंब्याचे पत्र सादर केले. याचे फोटोही समोर आले आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात नवीन सरकार स्थापनेसंदर्भातील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली असून सरकार स्थापना आणि शपथविधीबाबत चर्चा केल्याचे समजते. विजय यांनी यापूर्वी दोनदा राज्यपालांची भेट घेतली आहे. शनिवारच्या भेटीत विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आता त्यांची आघाडी आणखी मजबूत झाली आहे. राज्यपालांच्या या भेटीवेळी विजय एकटे आले नव्हते. त्यांच्यासोबत सीपीआय, सीपीआय(एम), काँग्रेस आणि इतर समर्थक पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. आता राज्यपाल विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. जर सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्या, तर विजय यांना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

युतीच्या धोरणानुसार पाठिंब्याचा निर्णय : आययूएमएल

चेन्नईमध्ये आययूएमएलचे अध्यक्ष के. एम. कादर मोहिदीन यांनी तामिळनाडूतील सरकार स्थापनेसंदर्भात एक मोठे विधान केले. आययूएमएलने तामिळनाडूची निवडणूक डीएमकेच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्ससोबत युती करून लढवली होती. पण आता दुसरा मित्रपक्ष एनडीए सरकारला पाठिंबा देत असल्याने आययूएमएलनेही त्याच धोरणानुसार त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

व्हीसीकेचा टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा

थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील व्हीसीकेने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. व्हीसीकेचा हा निर्णय थलपथी विजय यांच्यासाठी एक मोठा राजकीय पाठिंबा मानला जात आहे. आपला पाठिंबा बिनशर्त असल्याचे थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.