किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्…; आरोपी ‘लिफ्ट’ घेऊन प
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील पंचवटी (Panchavati) परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आडगाव नाका (Adgaon Naka) परिसरातील मधुर मिलन स्वीट्ससमोर एका सराईत मद्यपी गुन्हेगाराने किरकोळ वादातून सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार (45) यांचा चाकूने भोसकून जीव घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Nashik Crime News: नेमकी घटना काय?
मयत जयवंत पवार हे जुन्या नाशिकमधील रहिवासी असून त्यांचे अमरधाम रोडवर ‘तन्मय मेन्स पार्लर’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते आपल्या मित्रासोबत बाहेर पडले होते. पहाटे ३:३० च्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र विनोद आगळे आडगाव नाक्यावरून जात असताना, टायर पंक्चरच्या दुकानाजवळ संशयित आरोपी राजा काकवीपुरे हा दारू पीत बसलेला होता. यावेळी विनोद आगळे आणि आरोपी राजा यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक झाली. जयवंत पवार यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आरोपीने त्यांच्याशी झटापट सुरू केली.
Nashik Crime News: बुटातील चाकूने केला वार
झटापट सुरू असताना आरोपी राजा काकवीपुरे याने आपल्या बुटात लपवून ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला. त्याने केलेला पहिला वार हुकला, मात्र दुसरा वार पवार यांच्या छातीवर वर्मी बसला. हा वार इतका भीषण होता की, पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली आणि एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्यावर ‘लिफ्ट’ घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
Nashik Crime News: कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
जखमी अवस्थेत पवार यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत जयवंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Nashik Crime News: “पोलिसांचा वचक कमी झाला आहे का?”
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत जयवंत यांच्या पत्नी गीता पवार यांच्या फिर्यादीवरून राजा काकवीपुरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. भरवस्तीत आणि मुख्य नाक्यावर घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमधील सराईत गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.