दर शनिवारी, रविवारी माणगावात वाहतूककोंडीची साडेसाती कायम; लटकलेले चौपदरीकरण, रखडलेल्या बायपासमुळे फटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा महामार्गाचे लटकलेले चौपदरीकरण, लटकलेला बायपास, सर्व्हिस रोडचे काम यामुळे दर शनिवारी, रविवारी माणगावमधील वाहतूककोंडीची साडेसाती कायम आहे. त्यातच सध्या सर्वत्र लगीनघाई आणि मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने यात अधिकच भर पडली असून आज माणगाव बाजारपेठेतून जाणारा महामार्ग वाहतूककोंडीने जाम झाला होता. पुणे-दिघी मार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टळटळीत उन्हात हजारो प्रवाशांसह वाहनचालकांचा चांगलाच घामटा निघाला.

वाहतूककोंडीची समस्या माणगावकर नागरिकांसाठी काही नवीन नाही. शनिवार, रविवार तर शुक्रवारी अनेकदा संध्याकाळपासून माणगाव बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाची चक्काजामच असतो. लग्नसराई व वीकेंड असल्याने मुंबई व पुण्याकडून रायगड, रत्नागिरी तसेच श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांची व शनिवार, रविवार वीकेंडसाठी येणाऱ्यांची गर्दी वाढल्याने माणगाव शहरात वाहनांची तोबा गर्दी झाली होती. नागरिकांना चालतानासुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरील चालावे लागत होते. माणगाव शहरातील दररोजच्या वाहतूककोंडीने व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे. या महामार्गाच्या बाजूने चालणेही मुश्किल आणि अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे गिऱ्हाईकेदेखील दुकानात येत नाही अशी तक्रारी व्यापारी करत आहेत.

दोन तास आडकाठी

माणगाव शहरातील महामार्गाचे रुंदीकरण किंवा चौपदरीकरण झाले नसून बायपासने भविष्यातही वाहतूक वाढवण्यात येणार आहे. मात्र सर्व्हिस रोड आणि बायपास रस्त्याचे काम रखडखडत सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कचेरी मार्ग, गोवे मार्ग, निजामपूर मार्ग आणि बामणोली या मार्गावर रोजच वाहतूककोंडी होत असते. माणगाव शहरात वाहन आल्यावर ते एक ते दोन तास अडकून पडते. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. या कारणामुळे काही प्रवासी पुणे आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जातात.

Comments are closed.