CSK vs LSG: उर्विल पटेलचं ऐतिहासिक वादळ! एबी डिव्हिलियर्स-सुरेश रैनाचा मोठा विक्रम उध्वस्त
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपल्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सामना खेळला आहे. या सामन्यात चेन्नईला 204 धावांचे मोठे आव्हान मिळाले होते. 45 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या 27 वर्षीय उर्विल पटेलने (urvil patel) आपल्या तुफानी खेळीने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. उर्विलने अवघ्या 23 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने फक्त 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने एबी डिव्हिलियर्सचा 11 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.
लखनऊविरुद्धच्या या सामन्यात उर्विल पटेलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. 13 चेंडूत अर्धशतक झळकावून त्याने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक लावणाऱ्या यशस्वी जयस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
उर्विल आता चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या (Suresh Raina) नावावर होता, ज्याने 2014 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
IPL मधील सर्वात वेगवान अर्धशतके (Fastest Fifty):
यशस्वी जयस्वाल: 13 चेंडू (विरुद्ध KKR, 2023)
उर्विल पटेल: 13 चेंडू (विरुद्ध LSG, 2026)
केएल राहुल: 14 चेंडू (विरुद्ध DC, 2018)
पॅट कमिन्स: 14 चेंडू (विरुद्ध MI, 2022)
रोमॅरियो शेफर्ड: 14 चेंडस (वि CSK, 2025)
उर्विल पटेलने अशा पराक्रमाची नोंद केली जी आजवर कोणालाही जमली नव्हती. आपल्या खेळीच्या पहिल्या 8 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणारा तो आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच, पहिल्या 10 चेंडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता उर्विलच्या नावावर झाला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला, ज्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या 10 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. उर्विलने या सामन्यात पहिल्या 10 चेंडूत 42 धावा केल्या तसेच त्याने चेन्नईसाठी 23 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली.
Comments are closed.