ठाण्यात ४ हजार इमारती धोकादायक, पालिकेने केली यादी जाहीर… दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार नाही; प्रशासनाने केले हात वर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. ठाणे पालिका हद्दीत तब्बल ४ हजार ४३७इमारती धोकादायक असून सर्व इमारतींना प्रशासनाने नोटिसा चिटकवल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपला बंदोबस्त करावा, असे आवाहन करण्यात आले असून एखादी दुर्घटना घडून वित्तहानी, जीवितहानी झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असा अजब इशारा देत पालिकेने हात वर केले आहेत.

ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ४ हजार २९६ इमारती धोकादायक तर ९३ इमारती या अतिधोकादायक असल्याचे आढळून आले. अनेक इमारतींमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचा घोळ सुरू आहे. तसेच बहुतेक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक असा अहवाल आला आहे. तर इमारती रिकाम्या करण्यास नागरिक तयार नसल्याचे समोर आले आहे. इमारती रिकाम्या करण्याच्या मोहिमेला महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. परंतु इमारती रिकाम्या करताना महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

प्रभाग समितीनिहाय आकडेवारी
ठाणे महापालिकेकडून नोंदवण्यात आलेल्या यादीमध्ये मुंब्रा प्रभागात १ हजार ३६१, वागळेमध्ये १ हजार १०२, दिवा प्रभागात ५५२, नौपाडा-कोपरी ४३९, लोकमान्य सावरकरनगर २५७, कळवा २८६, उथळसर १७८, माजिवडा-मानपाडा १९३ तर वर्तकनगरमध्ये ६९ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये मुंब्यात सर्वात जास्त धोकादायक इमारती असून त्याखालोखाल वागळे इस्टेटमध्ये इमारती आहेत.
वर्गवारी खालीलप्रमाणे –
अतिधोकादायक सी- १, रहिवाशांना इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करण्यायोग्य इमारती सी – २ ए, इमारतीमध्ये राहून दुरुस्ती करता येण्यासारख्या इमारती सी -२ बी श्रेणीमध्ये येतात. तर सी ३ गटातील इमारती किरकोळ दुरुस्ती अशी वर्गवारी करण्यात येते. यामध्ये ९३ अतिधोकादायक इमारतींवर यमाचा दबा आहे.

Comments are closed.