भक्तांना मरणाची भीती दाखवून आलिशान गाड्या अन् कोट्यवधी रुपये उकळले; आता ईडीकडून खरातचा ताबा घेण

अशोक खरात प्रकरण: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ (ED) आता अशोक खरातचा ताबा घेण्याच्या तयारीत आहे. खरातने उभे केलेले आर्थिक साम्राज्य आणि त्यामागील मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) तपास करण्यासाठी ईडीने न्यायालयात अर्ज सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Ashok Kharat Case: अध्यात्म आणि भीतीचा ‘बनाव’

अशोक खरातने स्वतःला अध्यात्मिक गुरू भासवून हजारो भक्तांना जाळ्यात ओढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात भक्तांना ‘मरणाची भीती’ दाखवून त्यांना विविध पूजा करण्यास भाग पाडत असे. परदेशात ‘परीस पूजा’ आणि ‘अवतार पूजा’ करण्याच्या नावाखाली त्याने भक्तांकडून कोट्यवधी रुपये, महागड्या आलिशान गाड्या आणि मोक्याचे प्लॉट आपल्या नावावर करून घेतले. आशीर्वादाच्या नावाखाली चाललेला हा लुटीचा गोरखधंदा आता ईडीच्या रडारवर आला आहे.

Ashok Kharat Case: शेल कंपन्या आणि मनी लाँड्रिंगचा संशय

खरातच्या विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जमवलेला पैसा पांढरा करण्यासाठी खरातने अनेक बनावट (Shell) कंपन्या स्थापन केल्याचा संशय ईडीला आहे. या कंपन्यांमार्फत पैसा विविध ठिकाणी वळवण्यात आला असून, मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठे ‘मनी लाँड्रिंग’ झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Case: ईडीच्या तपासाला वेग येणार

अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे पोहोचले आहेत का, याचाही तपास केला जाणार आहे. त्याने जमवलेली कोट्यवधींची मालमत्ता नेमकी कशाच्या जोरावर उभी राहिली? आणि यामागे आणखी कुणाचे वरदहस्त आहेत का? हे खरातच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणात रविवारी (दि. 10) तब्बल सहा तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकर यांची सखोल चौकशी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, अशोक खरात यांच्यासोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांना धडाधड प्रश्न विचारत विविध मुद्द्यांवर खुलासे मागितले. यानंतर माध्यमांशी बोलताना चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलीय.

आणखी वाचा

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?, तेजस्वी सातपुतेंचे धडाधड प्रश्न; रुपाली चाकणकर म्हणाल्या…

आणखी वाचा

Comments are closed.