छत्रपती संभाजीनगर – शिऊर-बंगला येथे पहाटेच्या सुमारास आग; हॉटेल्स, टपऱ्या जळून खाक

शिऊर-बंगला येथे पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये जवळपास आठ ते दहा हॉटेल टपऱ्या, रसवंती जळून खाक झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या आगीमध्ये लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

छत्रपती संभाजीनगर – नाशिक राज्य महामार्गावर असलेल्या शिऊर-बंगला येथे पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. श्रीराम पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूला असलेल्या हॉटेल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या भागात आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहाटेची वेळ असल्याने या परिसरात हॉटेल व्यावसायिक कोणीही हजर नव्हते. मात्र हॉटेलच्या सुरक्षेसाठी एखादे दोन हॉटेल चालक हॉटेलमध्ये झोपलेले होते. अचानक उष्णता जाणवू लागली, जळाल्याचा गंध येऊ लागल्याने त्यांना जाग आली. तोपर्यंत या आगीने रौद्ररूप धारण केले होते. परिसर निर्मनुष्य असल्याने ही आग लवकर लक्षात आली नाही. आग वाढल्याने जवळपास आठ ते दहा हॉटेल मधील फ्रिज, फर्निचर सर्व जळून खाक झाले. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेला हा भाग सकाळी स्मशान शांततेत दिसून आला.

सुदैवाने पेट्रोल पंप वाचला

पेट्रोल पंपालगत असलेल्या हॉटेल परिसरात लागलेली आग जवळपास शंभर ते दीडशे फुटावर पसरली होती. याआगी मध्ये सर्व हॉटेल जळून खाक झाले. हॉटेलमध्ये झोपलेल्या कामगारांनी तातडीने हॉटेलमधील सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे मोठा स्फोट होण्यापासून वाचले. आग पेट्रोल पंपाकडे गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

अग्निशमन विभागाचा अभाव

वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शिऊर नाम उल्लेख करण्यात येतो. या गावाची लोकसंख्या तालुक्यातील इतर गावापेक्षा मोठे असून बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात बंगला येथे मोठमोठ्या बाजारपेठ आहेत. या बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांचे मोठे गाळे आहेत. याचा सर्व कर ग्रामपंचायत वसूल करते. या ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्या तरी ग्रामपंचायत हक्काने कर वसूल करते. यापूर्वी देखील एका कृषी व्यवसायिकाच्या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर गाव पातळीवर अग्निशमन यंत्रणा कार्यरत असावी असा सूर निघाला होता. मात्र सत्ताधाऱ्याच्या उदासीनतेमुळे आगीपासून संरक्षण मिळावे अशी कुठलीच यंत्रणा ग्रामपंचायतीने उभी केली नाही. एकीकडे कर घ्यायचा आणि दुसरीकडे सोयी सुविधा द्यायच्या नाही या भूमिकेमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

आगीचे कारण अस्पष्ट

पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र निर्मनुष्य असल्यामुळे आग कशामुळे लागली याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून पोलीस तपासानंतरच उघड होईल असे दिसते.

सीसीटीव्ही तपासणी करणार

हॉटेल व्यवसायिकांचे लाखोचे साहित्य जळून खाक झाले असून ही आग नेमकी लागली कशाने याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आगीचे नेमके कारण समजण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments are closed.